उरीच्या हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत सर्जिकल स्ट्राईकबाबत चर्चा केली आणि त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. दृढ राजकीय इच्छाशक्ती असल्यास अशा प्रकारची मोहीम तडीस नेता येते, त्यामुळे येणार्‍या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राईक देखील होऊ शकतो असं मत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकर अजून चार-पाच वर्ष असते, तर देशाच्या संरक्षण विभागाची परिस्थिती आणखी बळकट झाली असती असंही त्यांनी म्हटलं आहे. सर्जिकल स्ट्राईक या विषयावर आयोजिक कार्यक्रमाक निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर बोलत होते.

यावेळी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी म्हटलं आहे की, “मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री पदाच्या काळात जवानांसाठी १५ दिवसांत १६ हजार कोटींच्या साधन सामुग्रीच्या खरेदीस मंजुरी दिली. त्यामुळे आपली ताकद ८० टक्क्यांपर्यंत वाढली आहे”. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्यास सैन्यदल तयार होते. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तसं झालं नाही”.

“उरी हल्ल्यानंतर २१ सप्टेंबरला त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मला फोन करून आपण सर्जिकल स्ट्राईक करू शकतो का? असं विचारलं. जर आपण तयारीत असू तर लवकरात लवकर करा असे सांगून त्यांनी आम्हाला पूर्णपणे सुट दिली होती. आधुनिक शस्त्रास्त्रे आणि साधने दिली होती. त्यानंतर आम्ही २९ सप्टेंबरचा दिवस निश्चित केला आणि १० ते १२ मिनिटात तिथे जाऊन आपला उद्देश साध्य करायचे असे ठरवले. त्याप्रमाणे मिशन पूर्ण करण्यात आलं,” असं निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी सांगितलं आहे.

कलम ३७० बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “पंडित नेहरूनी जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा त्यावेळी संयुक्त राष्ट्राकडे घेऊन जाण्याची आवश्यकता नव्हती. त्याऐवजी आपल्या सैनिकांना आणखी सहा महिने दिले असते, तर त्याचवेळेस आपण काश्मीर मिळवू शकलो असतो. तसेच पाकिस्तानाचं सर्व अर्थकारण शेतीवर चालते आणि त्यांच्या देशात जाणार्‍या सर्व नद्याचं उगमस्थान काश्मीरमध्ये असल्याने त्यांना खऱ्या अर्थाने काश्मीरची गरज आहे”.

काश्मीरमधील ३७० कलम हटवणं गरजेचं होतं. यासाठी सरकारमध्ये हिम्मत आणि इच्छाशक्ती असणे आवश्यक होते. ते या सरकारने दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तान भारतावर हल्ला करेल का या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांनी आपल्यावर हल्ला केला, तर स्वागत असून त्यांच्यापेक्षा आपली ताकद खूप असल्याचे त्यांनादेखील माहिती आहे. त्यामुळे ते काही करू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.