यंदा पंधरा दिवसांच्या विलंबाने दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवासही लांबला आहे. राजस्थानमधून अद्यापही पाऊस परत फिरलेला नाही. आठवडाभरात साधारण: २० ते २५ दिवसांच्या विलंबाने राजस्थानमधून त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या दीर्घ अंदाजानुसार यंदाच्या हंगामात पाऊस समाधानकारक झाला आहे. सध्या पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. मात्र, अद्याप त्याचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकलेला नाही. उशिराने आलेला मोसमी पाऊस उशिरानेच जाणार असल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात १ ऑक्टोबरच्या आसपास त्याचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. आता साधारणत: १८ ते २० ऑक्टोबरला महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

पावसाची पुढील स्थिती काय?

आठवडाभर कमी- अधिक प्रमाणात बरसलेल्या पावसाने सध्या बहुतांश भागात उघडीप घेतली आहे. सध्या अरबी समुद्र ते गुजरात परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्र ते गुजरात दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. सध्या उघडीप असली, तरी २५ सप्टेंबरनंतर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता आहे.