चिन्मय पाटणकर

शालेय विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाणीवर शैक्षणिक कार्यक्रम सुरू करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड दोन महिन्यांपासून सांगत असल्या तरी प्रत्यक्षात हा उपक्रम दूरच आहे. राज्य शासनाकडून दूरध्वनीद्वारे चर्चेव्यतिरिक्त दूरदर्शनकडे अद्याप प्रस्तावच देण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी ऑनलाइन अध्यापन करण्याचे निश्चित झाले. मात्र, राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इंटरनेट जोडणी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आदी सुविधा मिळत नसल्याने एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दूरचित्रवाणी, रेडिओ या माध्यमांचा वापर करण्याचे राज्य शासनाने ठरवले. त्यानंतर दूरदर्शनवर वेळ मिळण्याबाबत गायकवाड यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना २९ मे रोजी पत्र पाठवले. मात्र केंद्र सरकारकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर दूरदर्शनवर वेळ मिळण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे गायकवाड यांनी अनेक वेळा सांगितले. मात्र दूरदर्शनकडे याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

‘‘दूरदर्शनसह दूरध्वनीद्वारे सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच ई मेल पाठवण्यात आला आहे. गेले काही दिवस दूरदर्शनच्या काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र, २१ जुलै रोजी दूरदर्शनकडून पत्राची मागणी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी सुटल्यावर प्रस्ताव सादर केला जाणार आहे,’’ असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रम सुरू का नाही?

शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी सह्य़ाद्री वाहिनीवर वेळ मिळण्याबाबत गायकवाड किंवा शालेय शिक्षण विभागाकडून दूरदर्शनकडे अद्याप प्रस्तावच सादर करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून किमान जुलैपासून अपेक्षित असलेला विद्यार्थ्यांसाठीचा शैक्षणिक कार्यक्रम अद्याप सह्य़ाद्री वाहिनीवर सुरू झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सह्य़ाद्री वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रमासाठी वेळ मिळण्याबाबत राज्य शासनासह चर्चा सुरू आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्याशी दूरध्वनीद्वारे बोलणे झाले आहे. मात्र अद्याप अधिकृत पत्रव्यवहार किंवा प्रस्ताव राज्य शासनाकडून सादर झालेला नाही. राज्य सरकारसाठी दुपारी २ ते सायंकाळी ६ अशी वेळही सह्य़ाद्री वाहिनीवर राखीव ठेवण्यात आली आहे. त्याबाबत अधिकृत पत्रव्यवहार, प्रस्ताव दिल्यास त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया केली जाईल.

– संदीप सूद, कार्यक्रम अधिकारी, सह्य़ाद्री वाहिनी