पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात मुसळधार पाऊस झाला असून याचा थेट फटका भात शेतीला बसला आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मावळ परिसरात भात शेती जोमात आली होती. काही ठिकाणी भात काढण्याचे काम सुरू होते. परंतु, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे असलेले पीक मुसळधार पावसाने झोडपून काढले असून आडवे झाले आहे.
मावळ हे भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. बहुतांश शेतकरी आपल्या शेतात भाताचे पिक घेतात. यावर्षी उशिरा पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. वरुण राजाने कृपा दृष्टी दाखवत पावसाने मध्यंतरी चांगला बरसला आणि भात पीक जोमात आले. दरम्यान, मावळमध्ये अनेक ठिकाणी भात काढण्यासाठी आला असून काही ठिकाणी कापणी झाली होती. परंतु, निसर्गाच्या पुढे कोणाचे चालते, बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिंपरी-चिंचवडसह मावळकरांना झोडपून काढले आहे.
भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभा राहीले आहे. मावळ तालुक्यात इंद्रायणी वाणाची 80 टक्के लागवड होते. त्याला सर्वदूर पसंती असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असतो. परंतु, यावर्षीचे चित्र काही वेगळेच असल्याचं दिसत आहे. मावळात १ हजार २०० एकर पेक्षा अधिक जमीन ही भात लागवडीसाठी वापरली जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 5:51 pm