घरातील पूजा असो किंवा शुभकार्यामधील अक्षता असोत तांदूळ हा हवाच.. कितीही पोटभर जेवलात तरी सुगंधी दरवळाच्या भाताशिवाय भोजनाची परिपूर्ती होत नाही, ही शरीराला लागलेली सवय.. मसालेभात, पुलाव, बिर्याणी असो किंवा इडली आणि डोसा त्यासाठीही तांदूळ महत्त्वाचा.. आपल्या जीवनातील तांदळाचे महत्त्व ध्यानात घेऊन ‘ग्राहक पेठ’ने सुरू केलेल्या तांदूळ महोत्सवाने यंदा रौप्यमहोत्सवी मजल गाठली आहे. वर्षभराचे धान्य भरून ठेवण्यासाठी ‘तांदूळ महोत्सव’ कधी सुरू होणार याची चोखंदळ पुणेकर वाट पाहत असतात आणि तांदूळ महोत्सव या उपक्रमाची लोकप्रियता त्यातच सामावली आहे.

चोखंदळ ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे तांदळाची निवड करून रास्त दरात खरेदी करता यावी, यासाठी ग्राहक पेठने तांदूळ महोत्सवाची कल्पना १९९३ मध्ये सर्वप्रथम रुजवली आणि ही कल्पना पुणेकरांनी उचलून धरली. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नवीन तांदळाचा हंगाम सुरू होतो. ग्राहक पेठेतील महोत्सवाच्या पहिल्या वर्षी अंदाजे २५ लाख रुपयांची विक्री झाली होती. हळूहळू ही उलाढाल वाढत गेली आणि ती आता तीन-चार कोटींच्या घरात गेली आहे. अन्नधान्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ यामध्ये मोठा फरक आहे. तांदळाची वैशिष्टय़पूर्ण चव, सुगंध आणि तांदळाच्या निवडीला भरपूर वाव असतो. तांदळामध्ये २५ ते ४० वैविध्यपूर्ण प्रकार आहेत. पूर्वी तुलनेने हे प्रकार कमी असण्याने ग्राहकांना निवडीला मर्यादा होत्या. पण आता तशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात तांदळाचे उत्पादन कमी होत असले, तरी अन्य राज्यातून भरपूर आवक असल्याने तुटवडा निर्माण होत नाही आणि विविध प्रकार उपलब्ध होऊ शकतात. तांदूळ साठवणुकीची प्रक्रिया टिकून राहिली. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे अन्नधान्याची वर्षभरासाठी साठवणूक केली जात असे. पण, काळानुसार कुटुंब विभक्त झाले असले, तरी धान्याच्या वर्षभराच्या साठवणुकीची कल्पना कालबाह्य़ झालेली नाही. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यामध्ये धान्याची साठवणूक करण्याची पद्धत सुरू आहे. त्यातही वर्षभरासाठी तांदूळ भरून ठेवण्यासाठी ग्राहकांचा विशेष कल असतो. याचे कारण तांदूळ जेवढा जुना होतो तेवढा तो खाण्यासाठी अधिक चांगला असतो, असे ग्राहक पेठचे कार्यकारी विश्वस्त सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.

हंगामाच्या सुरुवातीला तांदळाचे दर तुलनेने कमी राहतात. तांदळाचा दर्जा उच्च आणि वासही चांगला राहतो. आता ५० किंवा १०० किलो तांदूळ साठविणे अशक्य होते. पण आता ५ किलोपासून २५ किलोपर्यंत तांदळाचे पॅकिंग (ब्रँडेड) उपलब्ध असल्याने ग्राहकांना आवडीनुसार तांदळाची खरेदी करून साठवणूक करता येणे शक्य झाले आहे. महोत्सवामध्ये प्रामुख्याने पंजाब, दिल्ली, हरियाना येथून बासमती आणि त्याचे उपप्रकार, मध्य प्रदेशातून सुगंधी कालीमूछ, आंबेमोहोर, इंद्रायणी इत्यादी प्रकारचे तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध असतात.

मसुरी, सोना मसुरी, चंपाकळी, बासमती शेला, डुप्लिकेट बासमती हे प्रकार वर्षभराच्या साठवणुकीसाठी नसले तरी दैनंदिन वापरात घेता येतो. तांदूळ महोत्सवाबरोबर थंडीचा मोसम ध्यानात घेऊन सुकामेवा (ड्रायफ्रूट्स) घाऊक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. तांदूळ महोत्सवाचा रौप्यमहोत्सव आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त २६ फेब्रुवारी रोजी ‘तेजोमय तेजोनिधी’ हा सावरकरांच्या गीतावर आधारित नृत्याविष्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असेही पाठक यांनी सांगितले.

आता ऑनलाइन तांदूळ खरेदी

ग्राहक पेठेतील स्वस्त आणि दर्जेदार तांदूळ खरेदी करायचा असेल, तर आता शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीच्या वर्दळीमध्ये जायची गरज नाही. एक कळ दाबून तुम्ही ग्राहक पेठ येथील सर्व प्रकारचे तांदूळ पाहू शकता आणि घरबसल्या खरेदीही करू शकता. तांदूळ महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त हा महोत्सव आता ऑनलाइन आला आहे. लोकांना रास्त दरात दर्जेदार तांदूळ मिळावा म्हणून आम्ही सॅपकिराणा या स्टार्ट-अपच्या मदतीने ऑनलाइन तांदूळ खरेदीची सोय उपलब्ध करून दिली आहे. मार्केट यार्डच्याच दरामध्ये मात्र दर्जेदार नवीन तांदूळ घरपोच देण्याची सुविधा आम्ही ग्राहक पेठेच्या सहकार्याने नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे, असे सूर्यकांत पाठक आणि सॅपकिराणाचे जितेंद्र नेने यांनी सांगितले.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

nashik police conduct combing operation across the city due to festivals celebrations
नाशिक : सण, उत्सवांमुळे अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम

religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!