रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे हैराण झालेल्या प्रवाशांच्या व्यथा नेहमीच ऐकायला मिळतात. अनेकदा काहींना रिक्षावाल्यांच्या मनमानीपणाचा अनुभव देखील येतो. मात्र, सगळे सारखे नसतात हे  पिंपरी चिंचचवडमधील एका रिक्षाचालकाने दाखवून दिले. रिक्षामध्ये विसरलेले दोन ते अडीच लाख रुपयांचे दागिने  परत करत त्याने एका प्रवासी महिलेला दिलासा दिला. तसेच सहकारी रिक्षाचालकांसमोरही प्रामाणिकपणाचा  एक आदर्श ठेवला आहे. वसिम शेख असं या रिक्षाचालकाच नाव आहे.

गुरुवारी १८ तारखेच्या रात्री साडे आठ वाजता मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील शेतकरी कुटुंबातील वैशाली विनोद भेगडे या त्यांच्या वडिलांसोबत पिंपरी-चिंचवडच्या किवळे विकास नगर येथून वसिमच्या रिक्षात बसल्या. त्यांच्याकडे चार बॅग होत्या. त्यातील एका बॅगेत मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले तब्बल दोन ते अडीच लाखांचे सोन्याचे दागिने होते. देहूरोड रेल्वे स्थानकात घाई गडबडीत उतरताना सोन्याच्या दागिन्याची बॅग त्या रिक्षातच विसरल्या. जेव्हा हा सर्व प्रकार वैशाली यांच्या लक्षात आला तोपर्यंत रिक्षाचालक त्या ठिकाणाहून निघून गेला होता.

वैशाली भेगडे याना काय करावे हे सुचत नव्हते. त्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाची शोधा शोध सुरू केली. त्यांनी हा प्रकार नागरिकांना सांगितला. स्थानिक नागरिक देखील भेगडे यांच्या मदतीला धावले. याचवेळी वसीम शेख हा दुसऱ्या ग्राहकाला रिक्षात घेऊन त्याठिकाणी आला. त्यावेळी रिक्षातील वैशाली यांची बॅग भलत्याच महिलेला दिली असल्याचे वसिमने सांगितले. मात्र, त्या महिलेचा पत्ता माहिती असल्याने ती सोन्याची बॅग परत मिळाली. शेतकरी कुटुंबातील महिलेने सुटकेचा श्वास टाकला. वसिम याने त्या महिलेचा पत्ता सांगत बॅग मधील ८ तोळ्याचे दागिने परत केले. वैशाली भेगडे यांनी सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आणि रिक्षाचालकाचे आभार मानले.