‘आधी लढाई करोनाशी’ म्हणत अक्षय संजय कोठावळे या रिक्षाचालकाने स्वत:चे लग्न पुढे ढकलून महामारीविरुद्धच्या लढय़ात स्वत:ला झोकून दिले आहे. रिक्षा चालवून गरजूंना मदत करण्याबरोबरच पदरमोड करून दररोज दीडशे जणांची भूक भागविण्याची समाजसेवा तो करीत आहे.

टिंबर मार्केट भागात राहणाऱ्या अक्षय याचा टिंगरेनगर येथील रूपाली कांबळे हिच्याबरोबर २५ मे रोजी विवाह सोहळा होणार होता. पण, करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अन्न-पाण्यावाचून तडफडणारे जीव पाहून अक्षयचा जीव कळवळला. रूपालीने आणि  घरच्यांनी साथ दिली. लग्न पुढे ढकलून अक्षयने मित्रपरिवाराच्या साथीने मदतकार्य करण्याचा निर्णय घेतला.  त्याच्या वाडय़ातच त्याने स्वयंपाकघर उभारले आहे. शेजारीपाजारी राहणाऱ्या महिला अन्न शिजवून देतात. रवींद्र गायकवाड, राहुल जाधव या मित्रांच्या साथीने दररोज दीडशे भुकेल्या जीवांना अक्षय अन्न पुरवतो. लग्नासाठी जमवलेले दोन-अडीच लाख रुपये अक्षयने खर्च केले असले, तरी कासावीस जीवांचे लाखो दुवे त्याच्या गाठाशी जमा झाले आहेत.

संकटं आली की येतात एकामागून एक याची प्रचिती अक्षयला आली. त्याच्या काकांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि सोमवारी (१८ मे) त्याच्या वडिलांचे निधन झाले. याही परिस्थितीत डगमगून न जाता अक्षयचे हे मदतकार्य अविरत सुरू आहे. आता टाळेबंदी संपल्यानंतर अक्षय साधेपणाने लग्न करणार आहे.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वस्त शिरीष मोहिते, शाहीर हेमंत मावळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ज्येष्ठ पत्रकार गिरीश केमकर आणि रिक्षा चालक संघटनेचे खजिनदार बापू भावे यांनी अक्षयच्या या कार्याची दखल घेऊन त्याचा सत्कार केला.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शाहीर हेमंत मावळे यांच्या हस्ते अक्षय कोठावळे याचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. बापू भावे या वेळी उपस्थित होते.