नव्या रिक्षांची भर पडत असताना कारवाई थंड

शहरातील सर्व रिक्षा चालकांना व्यवसाय करीत असताना गणवेश आणि बिल्ला वापरणे सक्तीचे असल्याने याबाबत सुरुवातीच्या काळात करण्यात आलेली कारवाई आता थंड झाली आहे. त्यामुळे विशेषत: उपनगरांच्या भागात रिक्षाचालक गणवेश वापरत नाहीत, तर सर्वच भागामध्ये रिक्षाचालकांचा अधिकृत बिल्लाही गायब झाल्याचे चित्र आहे. रिक्षाच्या खुल्या परवान्यामुळे मोठय़ा प्रमाणावर नव्या रिक्षा शहरात दाखल होत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कायदा- सुव्यवस्था राखण्यासह प्रामाणिक रिक्षाचालकांना त्रास न होण्याच्या उद्देशाने संबंधित यंत्रणांनी कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे मत प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शहरामध्ये काही वर्षांपूर्वी रिक्षाशी संबंधित गुन्हेगारीच्या काही घटना घडल्यानंतर रिक्षाचालकांचा गणवेश आणि अधिकृत बिल्ल्याचा प्रश्न समोर आला होता. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने गणवेश आणि बिल्ल्याची सक्ती केली. त्यानंतर काही काळ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.  प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्तपणे करण्यात आलेली ही कारवाई काही दिवसांतच गुंडाळण्यात आली.

सद्यस्थितीत पिंपरी- चिंचवड शहरात बहुतांश भाग आणि पुण्यातील उपनगरांमध्ये बहुतांश रिक्षाचालक गणवेश वापरताना दिसत नाहीत. त्याचप्रमाणे सर्वच भागामध्ये रिक्षा चालक बिल्ला वापरत नाहीत. गणवेश आणि बिल्ला ही रिक्षा चालकाची व्यवसायाची अधिकृत ओळख आहे. रिक्षाचालकांनी खाकी रंगाचा, तर रिक्षाचा मालकच रिक्षा चालवित असल्यास त्याने पांढऱ्या रंगाचा गणवेश वापरणे सक्तीचे आहे. त्यावर आरटीओकडून दिला जाणारा बिल्ला लावणेही सक्तीचे आहे. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करा नंतरच गणवेश, बिल्ला सक्तीचा करा, अशी भूमिका रिक्षा संघटनांनी पूर्वी मांडली होती. कल्याणकारी मंडळाची घोषणा करून त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीही देण्यात आला आहे. त्यामुळे बिल्ला, गणवेशाची सक्ती पाळण्याबरोबरच मीटर न वापरणे आणि भाडे नाकारण्याचे प्रकारही थांबविण्याबाबत रिक्षा संघटनांकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रिक्षात ओळखपत्रही नाहीत

रिक्षाचे परवाने खुले करण्यात आल्याने सध्या शहरात नव्या रिक्षांची भर पडते आहे. सद्यस्थितीत पुणे आणि िपपरी- चिंचवड शहरात ५५ हजारांहून अधिक अधिकृत रिक्षा आहेत. गुन्हेगारीशी संबंधित घटना रोखणे आणि प्रामाणिक रिक्षा चालकाला व्यवसाय करता यावा, यादृष्टीने गणवेश आणि बिल्ला सक्तीचा आहे. त्याचप्रमाणे रिक्षा चालकाने त्याच्या आसनाच्या मागे आणि प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने स्वत:चे छायाचित्र, पत्ता, रिक्षा क्रमांक आदींची माहिती असलेले ओळखपत्र लावणेही आवश्यक आहे. मात्र, जवळपास सर्वच रिक्षांमध्ये अशा प्रकारचे कोणतेही ओळखपत्र दिसून येत नाही.