रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्यात आल्यानंतर रिक्षाच्या भाडय़ामध्ये काही बदल झाल्यास किंवा रिक्षाचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेत आता वैध मापन कायद्याचीही भर घालण्यात आली आहे. तंदुरुस्ती प्रमाणपत्र देण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मीटरची तपासणी केली जाते. मात्र, या तपासणीपूर्वी रिक्षा चालकांना त्यांच्या रिक्षाच्या मीटरचे आता वैध मापन विभागाकडून प्रमाणीकरण (कॅलिबरेशन) करून घ्यावे लागणार आहे. आणखी एका कायद्याचे ओझे वाढवून किचकट व वेळखाऊ पद्धत आणल्याने मीटर प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
रिक्षा पंचायतीच्या वतीने नव्या निर्णयाबाबत तीव्र अक्षेप घेण्यात आला असून, पंचायतीच्या वतीने या प्रश्नावर आवाज उठविला जाईल, अशी माहिती पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रिक्षाच्या भाडय़ामध्ये बदल झाल्यानंतर किंवा प्रत्येक वर्षी रिक्षाचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असते. पूर्वीच्या व्यवस्थेप्रमाणे शहरातील मीटरच्या दुरुस्ती व सेवा केंद्राच्या माध्यमातून मीटरची दुरुस्ती किंवा त्यात बदल करून अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून मीटरचे प्रमाणीकरण केले जात होते. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून वैध मापन विभागाने शहरातील मीटर दुरुस्ती व सेवा केंद्रांना सील केले आहे. रिक्षाच्या मीटरबाबत कोणतेही काम न करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता मीटरच्या दुरुस्तीसाठी कुठे जायचे हा प्रश्न रिक्षा चालकांपुढे निर्माण झाला आहे. संबंधित मीटरच्या कंपनीकडे आता मीटर न्यावा लागणार आहे. मात्र, बहुतांश कंपन्यांची केंद्रही पुण्यामध्ये नाहीत.
कंपन्यांकडून मीटरची दुरुस्ती केल्यानंतर आता अभियांत्रिकी महाविद्यालयाऐवजी वैध मापन विभागाकडून मीटरचे प्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर तंदुरुस्ती प्रमाणपत्र देण्यापूर्वी पुन्हा आरटीओ कडून मीटरची तपासणी केली जाईल. त्यामुळे रिक्षा चालकांना आता मीटरच्या बाबतीत दोन कायद्यातून जावे लागणार आहे. मात्र, त्याचा परिणाम म्हणून मीटरचे प्रमाणीकरणासाठी मोठा कालावधी लागणार आहे. किचकट प्रक्रिया व कालावधी वाढल्याने रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे वैध मापन विभागाच्या या निर्णयाबद्दल आरटीओलाही कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
—–
‘‘मीटरच्या प्रमाणीकरणाला आमचा विरोध नाही. मात्र दोन वेगवेगळ्या कायद्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. प्रमाणीकरणाची पूर्वीची पद्धत योग्य व कमी वेळेत पूर्ण होणारी असतानाही गोंधळ निर्माण करणारी व्यवस्था आणण्यास आमचा आक्षेप आहे. मुख्य म्हणजे त्याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. ‘हम करे सो कायदा’ यानुसार वैध मापन निरीक्षकांची नवी पद्धत सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. बदल करताना योग्य यंत्रणा तयार करणे, मुदत देणे आदी कोणत्याही गोष्टी करण्यात आल्या नाहीत. यातून वैध मापनाचे उद्दिष्ट साध्य होण्याऐवजी अवैध गोष्टींनाच वाव मिळू शकतो. त्यामुळे ‘रिक्षा पंचायत’ या प्रश्नावर आवाज उठविणार आहे.’’
– नितीन पवार, निमंत्रक, रिक्षा पंचायत