राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रिक्षाचे नवे परवाने ऑनलाइन अर्ज करून देण्यात येत आहेत. मात्र, परवाने मिळवून देतो, असे सांगून काही लोकांकडून रकमेची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. या फसवणुकीपासून अर्जदारांनी सावध राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
रद्द झालेले रिक्षाचे परवाने बेरोजगारांना देण्यात येणार आहेत. लॉटरी पद्धतीने या परवान्यांचे वितरण होणार आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज दाखल करण्याचे शुल्क शंभर रुपये आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्ये रिक्षाचा परवाना मिळवून देतो, असे आमिष काही लोक दाखवत असून, त्यासाठी जादा रकमेची मागणी केली जात आहे, अशा तक्रारी आल्या आहेत. मात्र, ऑनलाइन येणाऱ्या अर्जामधून अत्यंत पारदर्शीपणे म्हाडाच्या वतीने लॉटरी काढून अर्जदारांची निवड होणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन आरटीओ कडून करण्यात आले आहे.