रिक्षा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बॅजसाठी शिक्षणाची अट आठवी उत्तीर्ण अशी असली, तरी प्रत्यक्ष परवाना मिळविण्यासाठी दहावी उत्तीर्ण अशी अट शासनाने घातली आहे. लॉटरी पद्धतीने सध्या परवान्यांचे वितरण होत असताना सुरुवातीला याच अटीनुसार अर्ज मागविण्यात आले होते. प्रत्यक्षात पदवीधर असलेल्यांचेही मोठय़ा प्रमाणावर अर्ज आले. रिक्षा संघटनांकडून ओरड झाल्याने दहावी उत्तीर्ण ही अट शिथिल झाली, पण भविष्यात हीच अट कायम राहिल्यास शहरातील बॅजधारक रिक्षाचालकांच्या स्वप्नांना ‘ब्रेक’ लागणार आहे.
विविध कारणांनी रद्द झालेले रिक्षांचे परवाने बॅजधारक रिक्षाचालकांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, त्या वेळी अनेक वर्षे रिक्षाच्या परवान्याकडे डोळे लावून बसलेल्या रिक्षाचालकांना दिलासा मिळाला. परवाना नसल्याने दुसऱ्याच्या रिक्षावर अनेक वर्षे काम केलेल्यांना परवाना मिळण्याच्या शक्यतेमुळे मालक होण्याची संधी निर्माण झाली. परवाना मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या अटींची प्रसिद्धी झाली, त्या वेळी मात्र अनेक रिक्षाचालकांची साफ निराशा झाली. परवान्यासाठी अर्ज करताना संबंधित उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा, अशी अट त्यात होती.
परवाना हा रिक्षा बॅजधारकांनाच मिळतो. त्यामुळे काहींनी बऱ्याच वर्षांपासून बॅज काढून ठेवला होता. आता परवाना मिळण्याची संधी आली असताना केवळ शिक्षणाच्या अटीमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. विशेष म्हणजे बॅज मिळण्यासाठी पूर्वी चौथी उत्तीर्ण ही अट होती. ती वाढवून काही वर्षांपूर्वी आठवी उत्तीर्ण अशी करण्यात आली. परवाना मिळविण्यासाठी मात्र दहावी उत्तीर्ण ही अट घालण्यात आली. या विरोधात रिक्षा संघटनांनी आवाज उठविला. त्यामुळे ऐनवेळी आठवी उत्तीर्ण उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली. मात्र, तत्पूर्वी परवान्यासाठी शेकडो अर्ज दाखल झाले होते. त्यात अगदी पदवीधरांचाही समावेश होता.
रिक्षा परवान्याचे वाटप लॉटरी पद्धतीने झाले असले, तरी त्यात पूर्वी चौथी उत्तीर्ण असलेल्या बॅजधारकांना संधी मिळाली नाही. त्याचप्रमाणे आठवी उत्तीर्ण उमेदवारांनाही अर्जासाठी पुरेशी संधी मिळाली नाही. भविष्यात रिक्षा परवान्यासाठी दहावी उत्तीर्ण हीच अट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवी उत्तीर्ण असणाऱ्या व त्या आधारेच बॅज मिळवून रिक्षा परवाना मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रिक्षाचालकांची निराशा होणार आहे. त्यामुळे शिक्षणाची ही अट रद्द करून या रिक्षाचालकांनाही रिक्षामालक होण्याची संधी द्यावी, अशी मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात येत आहे.