पुण्यापेक्षा मुंबईत सीएनजीचे दर कमी असतानाही तेथे रिक्षाला भाडेवाढ देण्यात आली आहे. पुण्यात सीएनजीचे दर जास्त असून, इतरही गोष्टींमध्ये वाढ झाली असल्याने रिक्षाला भाडेवाढ द्यावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी याबाबत जिल्हा परिवहन प्राधिकरणाकडे निवेदन दिले. पुण्याचे सध्याचे रिक्षा भाडेदर २०१३ मध्ये अस्तित्वात आले. त्यानंतर इंधन, महागाई, रहाणीमान निर्देशांक, विमा हप्ता, रिक्षाची किंमत, सुटे भाग यामध्ये मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत मुंबईमध्ये दोनदा भाडेवाढ देण्यात आली. मुंबईपेक्षा पुण्यामध्ये सीएनजी प्रतिकिलो साडेपाच रुपयांनी महाग आहे. सीएनजीचे दर व इतर घटकांतील वाढ लक्षात घेता पुण्यातही रिक्षाला भाडेवाढ द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.