सातत्याने भाडेवाढीचा प्रश्न उपस्थित करून प्रवाशांची नाराजी ओढावून घेणारे, त्याचप्रमाणे भाडे नाकारणारे किंवा जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकांबद्दल नेहमीच रोष असतो. मात्र, हे रिक्षा चालकही काही विधायक करू शकतात, याची प्रचिती नुकतीच आली. श्रावणामध्ये रिक्षा थांब्यांवर महापूजांचे आयोजन करण्यात येते. यंदाही विविध थांब्यांवर त्याचे आयोजन करण्यात आले. पण, यंदा या श्रावणी पूजेला सामाजिक बांधीलकीची झालर होती. माळीणमध्ये घडलेल्या दुर्घटनेची आठवण विविध रिक्षा थांब्यांनी ठेवली व पूजेच्या खर्चातून काही रक्कम वाचवून ती दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाकडे दिली.
एखाद्याची रिक्षात विसरलेली पैशांची बॅग किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांची पिशवी प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षा चालकांची अनेक उदाहारणे शहरात घडलेली आहेत. पण, बहुतांश वेळेला रिक्षा चालकांबाबत नागरिकांमध्ये काहीशी नाराजीचीच भावना असते. पण, त्यांच्यातही सामाजिक बांधीलकीची भावना आहे, हे पटवून देणारे काही उपक्रमही रिक्षा चालकांकडून राबविण्यात येत असल्याचे एक उदाहारण म्हणजे माळीण दुर्घटनाग्रस्तांना देण्यात आलेला मदतीचा हात!
श्रावणामध्ये शहरातील जवळजवळ सर्वच रिक्षा थांब्यांवर सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात येते. रिक्षा चालक कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, प्रत्येकजण या पूजेमध्ये सहभागी होत असतो. यंदा रिक्षा पंचायतीने रिक्षा थांब्यांना माळीणच्या मदतीसाठी आवाहन केले. पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी केलेल्या या आवाहनाला पुणे व िपपरी- चिंचवडमधील रिक्षा थांब्यांनी प्रतिसाद दिला. सिंहगड रस्त्यावरील जय महाराष्ट्र रिक्षा स्टँड, साईबाबा रिक्षा तळ, जय महाराष्ट्र, प्रियदर्शनी रिक्षा तळ, कानिफनाथ रिक्षा तळ, अरण्येश्वर रिक्षातळ, भीमशक्ती रिक्षातळ, एमआयटी विद्यार्थी वाहतूक रिक्षाकाका, एम. महाराजा रिक्षातळ, मोरे विद्यालय रिक्षातळ, शिवाजीनगर रिक्षा संघटना, राजेंद्रनगर रिक्षातळ यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
सोमवार पेठेतील एम महाराज रिक्षातळ येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात तळाचे अध्यक्ष संजय पांगुळ यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीच्या नावाने रिक्षा संघटनांचा एकत्रित धनादेश देण्यात आला. निवासी तहसीलदार आर. ए. वायदंडे, पंचायतीचे नितीन पवार, रिक्षा पतसंस्थेचे उपाध्यक्ष करीम सय्यद तसेच प्रकाश वाघमारे, ए. एच. वाघमारे, अभिजित वाघचौरे, सिद्धार्थ चव्हाण, सोपान घोगरे, दशरथ चाकणकर, अण्णा कोंडेकर, किशोर जाधव, मनोज पिल्ले आदी त्या वेळी उपस्थित होते.