शासनाने लागू केलेल्या स्कूल बसच्या नव्या नियमावलीमध्ये रिक्षांमधून विद्यार्थी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी रिक्षाच्या रचनेमध्ये काही बदल करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यानुसार शालेय विद्यार्थी वाहतुकीतील रिक्षा बदलणे अपेक्षित असले, तरी सद्य:स्थितीत एकही रिक्षा बदललेली नाही. रिक्षा संघटनांनी या बदलाला विरोध केला असून, रिक्षा पंचायतीच्या वतीने शासनाकडे त्याबाबत हरकतही नोंदविण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने स्कूल बससाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. सुरुवातीला या नियमावलीनुसार रिक्षाला विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, अरुंद रस्त्यांच्या भागामध्ये रिक्षाला पर्याय नसल्याने या नियमावलीमध्ये रिक्षातून विद्यार्थी वाहकतुकीला परवानगी देण्यात आली. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या. विद्यार्थी वाहतुकीतील रिक्षांचे छत टणक करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला दरवाजेही बसवावे लागणार आहेत. त्यामुळे रिक्षाच्या संपूर्ण रचनेतच बदल करावे लागतील.
रिक्षाची रचना बदलण्यास रिक्षा संघटनांचा विरोध असल्याने अद्याप कोणत्याही रिक्षाची रचना बदलण्यात आली नाही. नव्या परिवहन कायद्याबाबत सूचना व हरकती देण्याच्या निमित्ताने शालेय रिक्षांचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. कायद्याबाबत हरकती नोंदविताना रिक्षा पंचायतीने रिक्षाची रचना बदलण्याबाबतही हरकत नोंदविली आहे. रिक्षातून विनाअपघात विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. स्कूल बसच्या अपघाताचे निमित्त करून त्याची शिक्षा रिक्षा चालकांना दिली जात असल्याचा आरोप पंचायतीने केला आहे.
विद्यार्थी वाहतूक हेच रिक्षा चालकांचे पूर्ण वेळचे काम नाही. त्यामुळे शालेय वाहतुकीसाठी वेगळी व प्रवासी वाहतुकीसाठी वेगळी रिक्षा अशी वर्गवारी करणे योग्य नाही. शिवाय टणक छत, बंदिस्त दरवाजे अशी रचना अपघाताला निमंत्रण देणारी आहे व रिक्षाचे वैशिष्टय़ संपविणारी आहे. त्याबाबत आम्ही यापूर्वीही आपेक्ष नोंदविला आहे. आम्ही रिक्षात सुचविलेले बदल विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित आहेत. त्याबाबतचा प्रस्तावही देण्यात आला आहे. त्यासाठी रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीची संख्या निश्चित करावी व अंतिम निर्णयापूर्वी चर्चा करावी, अशी मागणी रिक्षा पंचायत व राज्य रिक्षा चालक, मालक कृती समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.