प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुणे व पिंपरी- चिंचवड शहराच्य़ा हद्दीमध्ये रिक्षाच्या भाडय़ामध्ये वाढ केली असली, तरी वाढीव भाडय़ानुसार रिक्षाच्या इलेक्ट्रॉनिक मीटरचे प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) करून घेईपर्यंत रिक्षा चालकांना वाढीव भाडे घेता येणार नाही. त्यामुळे सध्या रिक्षाच्या मीटरमध्ये दिसणारेच भाडे प्रवाशांनी देणे अपेक्षित आहे. मात्र, काही रिक्षा चालकांकडून प्रमाणीकरणाशिवाय वाढीव भाडे मागण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. दरम्यान, रिक्षाच्या प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेने सध्या वेग घेतला असल्याचे दिसते आहे.
मुंबई विभागामध्ये रिक्षाची भाडेवाढ जाहीर झाल्यानंतर रिक्षाच्या भाडेवाढीचे सूत्र ठरविणारी हकीम समिती राज्य शासनाने बरखास्त केली होती. त्यामुळे रिक्षाच्या भाडेवाढीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, या भाडेवाढीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने मुंबईत भाडेवाढ झाली. त्याचाच आधार घेत हकीम समितीच्या सूत्रानुसार पुण्यात रिक्षाची भाडेवाढ जाहीर करण्यात आली. रिक्षाचे नवे भाडे १ जुलैपासून लागू करण्यात आले आहे. मात्र, यंदा प्रथमच रिक्षाच्या मीटरचे कॅलिब्रेशन झाल्याशिवाय रिक्षा चालकांना भाडेवाढ मिळणार नाही.
पूर्वी रिक्षाची भाडेवाढ लागू केल्यानंतर त्याच्या दिवसापासून वाढीव भाडे घेता येत होते. मीटरचे कॅलिब्रेशन झाले नसले, तरी नव्या भाडेपत्रकानुसार रिक्षा चालकांना वाढीव भाडे आकारण्याची मुभा होती. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे मीटरचे कॅलिब्रेशन होत नाही, तोवर संबंधित रिक्षा चालकाला वाढीव भाडे घेता येणार नाही. यंदाच्या भाडेवाढीनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कॅलिब्रेशनमध्ये रिक्षाच्या नव्या भाडय़ाच्या पत्रकाच्या सॉफ्टवेअरचा मीटरमध्ये समावेश करावा लागणार आहे. मीटर दुरुस्तीच्या व्यवस्थेकडून हे काम झाल्यानंतर वैधमापन अधिकाऱ्यांकडून त्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी सध्या रिक्षा चालकांची धावपळ सुरू आहे. सध्या ही प्रक्रिया वेगात सुरू असल्याचे दिसते आहे.
रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार याबाबत म्हणाले,की कॅलिब्रेशनबाबत अपुऱ्या यंत्रणेचा आम्हाला दंडच पडतो आहे. मात्र, देण्यात आलेल्या आश्वासनांनुसार आम्हाला काय अनुभव येतो, याची आम्ही वाट पाहतो आहोत. मुदतीत रिक्षा मीटरच्या कॅलिब्रेशनचे काम पूर्ण करायचे झाल्यास रोज दीड हजार रिक्षा मीटरचे कॅलिब्रेशन आवश्यक आहे. त्यासाठी पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये चार ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. कॅलिब्रेशनचे प्रमाणपत्र देण्यासाठी वैधमापन अधिकारी आरटीओच्या ट्रॅकवरच उपस्थित राहणार आहेत, याबाबत संघटनेला आश्वासने देण्यात आली आहेत.