रिक्षा चालकांना सीएनजी किट बसवण्यासाठी अनुदान देण्याची योजना महापालिकेतर्फे यंदाही राबवली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षांत महापालिकेतर्फे १,२०० रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी एक कोटी ४४ लाख रुपये खर्च होणार आहेत.
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे ही योजना सुरू करण्यात आली असून योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सन २०११-१२ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. रिक्षांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने रिक्षाचालकांना सीएनजी किट खरेदी करण्यासाठी महापालिकेने अनुदान द्यावे अशा प्रकारची ही योजना असून गेल्या चार वर्षांत १४ हजार रिक्षांना सीएनजी किटसाठी महापालिकेने अनुदान दिले आहे. यंदा १,२०० रिक्षांना किट बसवण्यासाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी एक कोटी ४४ लाखांच्या खर्चाला मान्यता द्यावी असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान देण्याच्या योजनेत गेल्या चार वर्षांत १८ कोटी ६० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून परवानाधारक रिक्षांना हे अनुदान दिले जाते. हे अनुदान मिळण्यासाठी रिक्षा परवाना, प्रादेशिक परिवहन खात्याच्या मान्यतेचे प्रमाणपत्र, सीएनजी किट बसवल्याची पावती आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ही योजना सुरू झाली त्या वर्षी, सन २०११-१२ मध्ये १,६६० रिक्षांना तर सन २०१२-१३ या वर्षांत ८,७३९ रिक्षांना अनुदान देण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये १,६५० रिक्षांना आणि गेल्यावर्षी २,१६१ रिक्षांना हे अनुदान देण्यात आले.