रिक्षा चालकांच्या सीएनजी पुरवठय़ाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा बंदचा निर्णय न घेता आठ ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा रिक्षा पंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.
रिक्षा पंचायतीच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाबाबत पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी ही माहिती दिली. ९ ऑगस्टला ईद असल्याने तोवर रिक्षा बंद आंदोलन केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने रिक्षांना सीएनजीची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश रिक्षा सीएनजीवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. मात्र, शहरात सीएनजीचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्याने उपलब्ध पंपांवर रिक्षांच्या मोठय़ा रांगा लागल्याचे चित्र असते. रांगेमध्ये तासन्तास घालवावे लागत असल्याने रिक्षा चालकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.
सीएनजीच्या या प्रश्नावर उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात येणार आहे.