हलक्या सरींची हजेरी; आठवडय़ात पावसाचा अंदाज

पुणे : यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच सरासरीच्या पुढे असलेल्या पुणे शहर आणि परिसरातील पाऊस बुधवारी (२२ जुलै) सरासरीच्या तुलनेत मागे पडला. जुलैमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला असताना शहर, परिसर कोरडा राहिला आहे. मात्र, पुढील आठवडाभर शहरात पावसाची शक्यता असून, जिल्ह्यांतील घाटक्षेत्रांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात बुधवारी काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोसमी पावसाच्या आगमनानंतर चांगल्या पावसाची नोंद झाली होती. निसर्ग चक्रीवादळाच्या काळातही शहरात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात पुणे आणि परिसरातील पाऊस सरासरीच्या पुढे होता. अगदी जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पुण्यातील पाऊस सरासरीच्या तुलनेत ४० ते ६० मिलिमीटरने अधिक होता. त्यानंतर पावसाने दीर्घ ओढ दिली.  २२ जुलैपर्यंत शहरातील सरासरी पाऊस २७० मिलिमीटर इतका असतो. पण, शहरात केवळ २६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातच नव्हे, तर शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतही पावसाने ओढ दिली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये सुमारे पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी आहे. ही बाब शहराची चिंता वाढविणारी ठरते आहे.

शहरात आणि जिल्ह्यातील पावसाबाबत पुणे वेधशाळेकडून मात्र आशादायी अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी शहरात हलका, तर उपनगरांच्या काही भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळेच लोहगाव केंद्रामध्ये २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तापमानात वाढ

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात वाढ झाली आहे. पावसाळी आणि ढगाळ स्थितीत २७ ते २८ अंश सेल्सिअसवर असलेले दिवसाचे कमाल तापमान आता ३० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवतो आहे. बुधवारी शहरात ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत ३.७ अंशांनी अधिक आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री काहीसा उकाडा आहे. बुधवारी २३.३ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तेही सरासरीच्या तुलनेत १.२ अंशांनी अधिक आहे.