News Flash

धोरणात्मक निर्णय होत नसल्याने पिंपरीतील वर्तुळाकार मार्गाचा संभ्रम कायम

२० वर्षांपासून नुसतीच चर्चा सुरू आहे. सद्य:स्थितीत ६५ टक्के जागा पालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येते.

प्रस्तावित वर्तुळाकार मार्ग

 

३० किलोमीटरचा प्रस्तावित रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात; पालिकेची आजपासून मोहीम

‘ट्राम’, ‘मोनोरेल’, ‘बीआरटी’ की अन्य काही या बाबत शहरातील वाहतूकप्रणालीविषयी धोरणात्मक निर्णय होत नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रुट- एचसीएमटीआर) या वर्तुळाकार मार्गाविषयी संभ्रमावस्था कायम आहे. जवळपास ७०० कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात येणारा ३० किलोमीटरच्या वर्तुळाकार मार्गाचे गेल्या २० वर्षांपासून नुसतेच नियोजन सुरू आहे. मात्र, कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीच होताना दिसत नाही. अशा परिस्थितीतही, या नियोजित मार्गावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे.

महापालिकेच्या वतीने रहाटणी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्गावरील अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे शुक्रवारी व शनिवारी (१६, १७ जून) काढण्यात येणार आहेत. या संदर्भात आयुक्त कक्षात बैठकही झाली. तेथील चर्चेनुसार साई चौक ते रहाटणी येथे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात येणार आहे. कोकणे चौक ते काळेवाडी फाटा हा पर्यायी रस्ता म्हणून नियोजित आहे. त्यासाठी या मार्गावरील ३५ अतिक्रमणे काढण्यात येणार असून नागरिकांनी स्वत:हून बांधकामे काढून घ्यावीत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

कासारवाडी, नेहरुनगर, एमआयडीसी, स्पाईन रस्ता, भक्ती-शक्ती, रावेत, वाल्हेकरवाडी, काळेवाडी फाटा, रहाटणी, िपपळे सौदागर, िपपळे गुरव व कासारवाडी असा नियोजित ३० किलोमीटरचा वर्तुळाकार मार्ग आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी १९९७ च्या विकास आराखडय़ानुसार हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. २० वर्षांपासून नुसतीच चर्चा सुरू आहे. सद्य:स्थितीत ६५ टक्के जागा पालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येते. ताब्यातील काही जागेसह ताब्यात नसलेल्या काही जागांवर अतिक्रमण झाले आहे. ही अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात रहाटणीपासून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पिंपरी पालिका व पिंपरी प्राधिकरणाकडून हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या भागात प्राधिकरणाने यापूर्वीच मोठी कारवाई केली आहे. रहाटणी ते कासारवाडी दरम्यानच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे.

विजय भोजने, उपअभियंता, पिंपरी पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 5:01 am

Web Title: ring road project pimpri pcmc
Next Stories
1 शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज ९० व्या वर्षांत पदार्पण
2 नामवंतांचे बुकशेल्फ : दृष्टिहीन विद्यार्थ्यांतर्फे ब्रेल लिपीतून साहित्याचा गौरव
3 कोऱ्या पाठय़पुस्तकांचा गंध हरवला..
Just Now!
X