बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्यावर नियंत्रण आणण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते. शहरातील कथित भाई आणि त्यांच्या पिलावळांना आताच लगाम न घातल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. बेस्ट सिटी म्हणून देशपातळीवर कौतुक झालेल्या पिंपरी-चिंचवडची ओळख आता क्राइम सिटी होऊ लागली आहे. वाढती गुन्हेगारी हा सध्याचा कळीचा मुद्दा असून त्याला जबाबदार कोण, याचा सर्वानी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.

गावखेडय़ांचे शहर बनलेल्या पिंपरी-चिंचवडचे पालकत्व जवळपास २० वर्षे ज्यांच्याकडे होते, त्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगवीत बोलताना पिंपरी-चिंचवड आता गुन्हेगारांचे शहर झाले आहे असे सांगत येथील गुन्हेगारी कारवायांचा पाढाच वाचला. सत्ताधारी आमदार-खासदार, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर त्यांनी खापर फोडले. शहराचा कारभार हातातून गेल्याचे शल्य असलेल्या पवारांचे त्यामागे राजकारण होतेच. मात्र, तरीही उद्योगनरीतील गुन्हेगारी वाढल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतला असता शहरातील गुन्हेगारीने कळस गाठला आहे. ही गुन्हेगारी आताच बोकाळलेली नाही. अजित पवार शहराचे कारभारी होते, तेव्हाही अशीच परिस्थिती होती. आता त्याचे प्रमाण आणि गांभीर्य कमालीचे वाढले आहे.

जवळपास २२ लाख लोकसंख्या झालेल्या पिंपरी-चिंचवडसाठी १५ ऑगस्ट २०१८ पासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले. पहिले पोलीस आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांनी सूत्रे स्वीकारली. वाढत्या गुन्हेगारीला या आयुक्तालयामुळे आळा बसेल आणि येथील परिस्थितीत सुधारणा होईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे काही होताना दिसत नाही. गुन्हेगारी कमी न होता वाढत असून पोलीस यंत्रणा गुन्हेगारांपुढे आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्यांपुढे हतबल असल्याचे दिसून येते. वर्षभरात जवळपास ७२ खून झाल्याची आकडेवारी पोलीस सांगतात. म्हणजेच, महिन्याला होणारे सहा खून हे प्रमाण चिंताजनक आहे.

शहरात किरकोळ कारणांवरून हाणामाऱ्या होतात. चाकू, तलवारी, कोयते मिरवत रस्त्यावर उन्माद केला जातो. वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण वाढते आहे. बेकायदा दारू, गुटखा तसेच गांजा विक्रीला पायबंद नाही. रस्त्यांवरचे खुले बार जोमात आहेत. महिलांची छेडछाड, विनयभंग, अत्याचाराच्या घटना कमी होण्याची चिन्हे नाहीत. अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. अशा परिस्थितीने नागरिक धास्तावले आहेत. संरक्षणकर्त्यां पोलिसांवरच हल्ले होण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. पोलीस अधिकारी तसेच खात्यातील विविध विभागांमध्ये समन्वय नाही. पोलिसांची उठावदार अशी कामगिरी दिसून येत नाही. अंतर्गत बदल्यांवरून तीव्र असंतोष आहे. मध्यंतरी दोन बडय़ा बांधकाम व्यावसायिकांच्या वादात बडय़ा पोलीस अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले. त्यानंतर झालेल्या बदली नाटय़ावरून पोलीस दलात सर्वकाही आलबेल नाही, असाच संदेश बाहेर गेला. ‘चकमक’फेम राम जाधव पिंपरीत सहायक आयुक्त म्हणून रुजू झाले, तेव्हा गल्ली-बोळातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते. मात्र, जाधव सध्या नेमके काय करत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राजकीय मंडळींचा हस्तक्षेप पोलिसांसाठी डोकेदुखीचा विषय आहे. सिग्नल तोडणाऱ्यापासून ते एखाद्या गुन्ह्य़ात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेताच पुढाऱ्यांच्या दबावाला सुरुवात होते. शहरातील कुख्यात आणि उदयोन्मुख गुन्हेगारांचे राजकीय नेत्यांपर्यंत लागेबांधे आहेत. गुन्हेगारांना ताकद देण्याचे काम कोणत्याही एका पक्षाचे किंवा नेत्यापुरते मर्यादित नसून सर्व पक्षीयांनी पोसलेली गुन्हेगारी शहरभरात बोकाळलेली दिसते आहे.

जिथे सत्ता, तिथे गुन्हेगार

गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी सत्ता कोणाकडे आणि गृहखाते कोणाकडे आहे, हे पाहून त्या-त्या पक्षनेत्यांचे पाठबळ मिळवतात. त्यानंतर, या गुन्हेगारांचा उन्माद सुरू होतो. गृहखाते राष्ट्रवादीकडे होते, तेव्हा अनेक गुन्हेगार राष्ट्रवादीत गेले. त्याचपद्धतीने गृहखाते भाजपकडे आल्यानंतर गुन्हेगारांनी भाजपचा रस्ता धरला आहे. अशा राजकीय आशीर्वादामुळेच गुन्हेगार आणि त्यांचे बगलबच्चे पोलिसांच्या जाळ्यात येत नाहीत.

शंभर गुन्हेगार तडीपार

उद्योगनगरीचे पोलीस काहीच करत नाही, असे काही नाही. गेल्या सहा महिन्यांत शंभराच्या घरात सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी हद्दीतून तडीपार केले आहे. रस्त्यावर केक कापल्यास गुन्हे दाखल करण्यात येऊ लागल्याने या वाह्य़ात प्रकाराला आळा बसला आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने तलवारीने केक कापल्याची चित्रफीत प्रसारित होताच हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खुनाच्या आरोपातील एक गुन्हेगार जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याची मिरवणूक काढण्याचा प्रकार चिंचवडला घडला. त्याची चित्रफीत प्रसारित होताच पोलिसांनी त्याला गजाआड करून त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल केले. हिंजवडीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेतला आहे.