करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील तीन महिन्यांपासून पोलीस अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत. दरम्यान, पोलीसांना देखील मोठ्या प्रमाणावर करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ५० वर्षावरील २३ हजार पोलिसांना स्टेशनमध्ये काम, तर ५५ वर्षावरील १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून घरीच राहण्याची परवानगी दिली आहे, या काळात त्यांचा पगारही सुरु राहणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुण्यात दिली.

गृहमंत्री देशमुख यांनी पुण्यातील ताडीवाला रस्ता येथील कंटेन्मेंट झोन आणि येरवडा भागातील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी त्या परिसरातील माहिती जाणून घेतली. तर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गाशी संवाद साधला. यावेळी देशमुख म्हणाले, “करोनामुळे राज्यात पोलिसांचे अनेक बळी गेले आहेत. मृत पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकार ६० ते ६५ लाख रूपयांपर्यंत मदत देत आहे. तर आता यापुढील काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या उपचारसाठी डेडिकेटेड रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांना करोनावर उपचारांसाठी गरज पडल्यास १ लाख रुपयांपर्यंत अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत त्यांना कुठल्याही रुग्णालयात मोफत उपचारही घेता येतील, अशी माहितीही यावळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पुण्यात येरवडा येथील कोविड रुग्णालयाला त्यांनी भेट दिली यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.

“काळजी घेत आहात ना स्वतःची”

ताडीवाला रस्ता येथील कंटेन्मेंट झोन आणि येरवडा भागातील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथील कोविड सेंटर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र यांच्याशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संवाद साधला. यावेळी कर्मचारी वर्गामध्ये उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने गृहमंत्र्यांनी त्यांची विचारपूस करताना म्हटले, “तुमची तब्येत ठीक आहे ना, ड्युटीवर असताना काळजी घेता आहात ना?”