आंबील ओढय़ाकाठच्या सोसायटय़ा, वसाहतींना सर्वाधिक झळ

ओढे, नाले आणि नदीपात्रात अतिक्रमण करून पात्र हवे तसे वळवण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरू असल्यामुळे अधूनमधून वेगवेगळ्या भागात दुर्घटना घडतात. पण ओढे, नाले बुजवल्यामुळे केवढे मोठे नुकसान होऊ शकते याचे प्रत्यंतर आंबील ओढय़ाला बुधवारी रात्री आलेल्या पुराने आले. आंबील ओढय़ाला आलेल्या पुरात दक्षिण पुण्यातील हजारो घरांचे नुकसान झाले आणि सहा जणांना प्राण गमवावे लागले.

निंबाळकर वाडी, गुजर वाडीत गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात डोंगरफोड सुरू आहे. या भागात गुंठेवारीने भूखंडांची विक्री केली जात असून त्यावर घरे, इमारती बांधण्यात आल्या आहेत. या डोंगरातून पाणी बुधवारी रात्री कात्रज तलावात आले आणि तेथून ते आंबील ओढय़ात शिरले. हे पाणी पूर्वी नैसर्गिक रीत्या वाहून जात असे. मात्र आता ते ओढे बुजवले गेल्यामुळे सर्व पाणी कात्रज तलावात आले आणि तलाव भरून वाहू लागला. पाण्याला मोठा वेग होता आणि आंबील ओढय़ात ते पाणी न मावल्यामुळे ते पात्र सोडून बाहेर पडले. त्यामुळे नाल्याच्या संरक्षक भिंती कोसळल्या आणि घरांचे तसेच वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.

मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण पुण्यातील कात्रज, बिबवेवाडी, इंदिरानगर, पद्मावती, सहकारनगर या भागांना बसला. आंबील ओढय़ाचे पाणी या भागातील अनेक सोसायटय़ात आणि घरांमध्ये शिरले. पद्मावती भागातील गुरुराज सोसायटीतील मागील बाजूस असलेल्या नाल्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर या सोसायटीत वेगाने पाणी शिरले. या सोसायटीतील दहा इमारतींना पाण्याने वेढा घातला. गुरुराज सोसायटीत तळमजला ते पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होते. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र इमारतींच्या गच्चीवर काढावी लागली.

पावसाने झोडपून काढल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास आंबील ओढय़ाला पूर आला. पुराचे पाणी एवढे जोरात येत होते, की त्यामुळे पद्मावती भागातील नाल्याची संरक्षक भिंत फुटली आणि पाणी थेट सोसायटय़ांमध्ये शिरले. एवढेच नाही तर पद्मावती येथील जलकेंद्रात पाणी शिरल्याने पाणीपुरवठा करणारी पंपिंग यंत्रणा मध्यरात्रीनंतर बंद पडली. त्यामुळे रहिवाशांनी इमारतीच्या गच्चीवर धाव घेतली.

सहकारनगर, अरण्येश्वर भागातील टांगेवाला वसाहतीत पाणी शिरले. या वसाहतीतील एका इमारतीची भिंत कोसळून वसाहतीतील पाच जणांचा मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील हिंगणे, वडगाव बुद्रुक, किरकिटवाडी, कोल्हेवाडी येथील घरांमध्येही पाणी शिरले होते. या भागातील काही सोसायटय़ांमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होते.

आंबील ओढय़ाचा प्रवास

कात्रज जुना घाट, कात्रज तलाव, धनकवडी, बिबवेवाडी, इंदिरानगर, लेक टाऊन सोसायटी, राजस सोसायटी, गुरुराज सोसायटी, पद्मावती, सहकारनगर, बागूल उद्यान, पर्वती गाव, दांडेकर पूल मार्गे नदीत

मुक्या जनावरांचाही मृत्यू

सहकारनगर भागातील शिंदे हायस्कूल परिसरात तळजाईच्या डोंगरावरून पाण्याचे लोट येत होते. या परिसरातील गोठय़ात बांधलेल्या गाईंनाही पाण्याचा फटका बसला. गजानन महाराज मंदिर चौकात गुरुवारी सकाळी पाच गाई मृतावस्थेत सापडल्या.