राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य डॉ. अशोक कुकडे यांची खंत
महाराष्ट्रातील बहुतांश नद्यांचे रूपांतर एकतर मोठय़ा खड्डय़ांमध्ये झाले आहे किंवा त्यांची अवस्था गटारांप्रमाणे झाली आहे, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अशोक कुकडे यांनी निगडीत व्यक्त केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ३३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ओरिसा येथील उत्कल बिपन्न सहायता समिती तसेच पुण्यातील जागृती सेवा संस्थेला सावरकर पुरस्काराने गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, मंडळाचे अध्यक्ष सतीश पाटील, सदाशिव रिकामे आदी उपस्थित होते.
डॉ. कुकडे म्हणाले, लातूरच्या पाणीटंचाईचा विषय गाजतो आहे. फेब्रुवारीपासून तेथे पाणीव्यवस्था ठप्प आहे. ते आकस्मिक संकट नव्हते. अनेक वर्षे उतरंड होती, टप्प्याटप्प्याने पाणी कमी होत होते. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही, ही समाजाची चूक होती. वंचितांना मदत करणारा समाज जागृत असतो व असा समाज पुढे जात असतो. अनेक घटक आपापल्या पातळीवर सामाजिक काम करत असतात, ते एकप्रकारे समाजातील सज्जनशक्तीचे जागरण असते. इस्राईलमध्ये जेमतेम पाऊस पडतो. तरीही तो प्रदेश समृद्ध आहे. प्रबळ इच्छाशक्ती व प्रगत तंत्रज्ञानातून त्यांनी ते शक्य करून दाखवले. आपण असे का करू शकत नाही, असा मुद्दा उपस्थित करत समाजाने ठरवले तर काहीही शक्य आहे, असा विश्वास कुकडे यांनी व्यक्त केला.
डॉ. फिरोदिया म्हणाले, फक्त असहकार आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालेले नाही. महात्मा गांधी यांनी सर्वसामान्यांपर्यंत क्रांती नेली. मात्र, तेवढय़ाने इंग्रज देश सोडून गेले नसते. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वेगळ्या प्रकारची जनजागृती केली म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रज देश सोडून गेले. इंग्रजांनी देशाची फाळणी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यास गांधी कारणीभूत नव्हते. आपला देश सरकारने नव्हे तर समाजाने घडवला आहे. समाजाला दिशा देणाऱ्या, समाज घडवणाऱ्या नि:स्पृह संस्थांचा गौरव होणे गरजेचे आहे, असे सांगत डॉ. फिरोदिया यांनी, ओरिसातील उत्कल आणि पुण्यातील जागृती, या संस्थांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rivers condition like a drains
First published on: 31-05-2016 at 06:39 IST