रेल्वेच्या आरक्षित डब्यामध्ये अनारक्षित डब्याचे तिकीट काढलेल्या प्रवाशाला अनधिकृतपणे घुसवून त्याच्याकडून तिकिटाच्या फरकाची व दंडाच्या रकमेची वसुली करण्याचा नियमबाह्य़ उद्योग रेल्वेकडून मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. त्यातून आरक्षित डब्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घुसविले जात असल्याने तीन महिने आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही डब्यामध्ये हाल सहन करावे लागतात. मुळातच क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात अनारक्षित तिकिटांची विक्री होत असल्याने अनारक्षित डब्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नसल्याने या प्रवाशांचीही गैरसोय होते. रेल्वेने हा नियमबाह्य़ उद्योग तातडीने बंद करून ठरावीक मार्गावर जादा डब्यांची किंवा अतिरिक्त गाडय़ांची सुविधा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या दरभंगा, गोरखपूर, लखनौ, बनारस, पटना, हावडा, झेलम या गाडय़ांना नेहमीच मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. काही दिवसानंतर उन्हाळ्याच्या सुटय़ा सुरू होतील. या कालावधीत या गाडय़ांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. याचे एक कारण प्रवाशांची वाढलेली संख्या असली, तरी रेल्वेची नियोजन शून्यता व नियमबाह्य़ उद्योगही त्यास कारणीभूत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत आहे. रेल्वेचा कायदा पाहता द्वितीय क्षेणी आरक्षित स्लीपर कोच डब्यामध्ये ७२ प्रवासी प्रवास करू शकतात. त्यानंतर ७३ वा प्रवासी डब्यात बसविता येत नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला अनारक्षित तिकिटांची क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात सर्रासपणे विक्री केली जाते. याचा परिणाम म्हणून अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांना स्वत:ला अक्षरश: कोंबून घ्यावे लागते. त्यातील अनेक जण द्वितीय क्षेणीच्या आरक्षित डब्यांकडे धाव घेतात.
अनारक्षित तिकीट काढलेल्या प्रवाशाला आरक्षित डब्यामध्ये जागा मिळवून देण्याचा उद्योग तिकीट तपासनिसांच्या माध्यमातून केला जातो. रेल्वेच्या नियमानुसार आरक्षित डब्यामध्ये अनारक्षित तिकिटावरील प्रवासी सापडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानंतर त्याला येणाऱ्या स्थानकामध्ये डब्यातून खाली उतरविण्यात येते. मात्र, अशा प्रकारे नियमानुसार कारवाई न करता, प्रवाशाकडून फलाटावरच दंड व तिकिटाच्या फरकाची रक्कम घेऊन त्याला आरक्षित डब्यामध्ये रीतसर प्रवेश मिळवून देण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे आरक्षित डब्यातील प्रवाशांना आरक्षण करूनही अनेकदा स्लीपर कोच सुविधेचा लाभ घेता येत नाही. ७२ आसनांची क्षमता असलेल्या डब्यांमधून कधीकधी तीनशेहून अधिक प्रवासी बसविले जातात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात या सर्वच प्रवाशांचे हाल होतात.
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा या प्रकाराबाबत म्हणाल्या,की आरक्षित डब्यामध्ये अनारक्षित तिकीट काढलेला प्रवासी बसवून रेल्वे प्रवाशांचीच फसवणूक करते आहे. त्यामुळे आरक्षण करूनही प्रवाशाला योग्य सुविधा मिळू शकत नाही. या प्रकाराबाबत प्रवाशांनी तक्रारी करणे गरजेचे आहे. सुविधा मिळाली नसल्यास त्याची नुकसान भरपाईही रेल्वेकडून वसूल करता येते. रेल्वेने हा अनधिकृत उद्योग बंद करून अनारक्षित तिकिटांची क्षमतेप्रमाणेच विक्री करावी व प्रवाशांची संख्या लक्षात घेता जादा डब्यांची सुविधा द्यावी.

वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी..

विनातिकीट किंवा योग्य तिकीट न घेताच प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडाची वसुली करण्यासाठी तिकीट तपासनिसांना प्रत्येक महिन्याला व वर्षांला एक ठराविक लक्ष्य ठरवून दिलेले असते. अशा प्रकारे कारवाई केलेल्या प्रवाशांची आकडेवारी रेल्वेकडून जाहीर केली जाते. मात्र, त्यातील योग्य तिकीट नसताना पकडलेल्या प्रवाशांमध्ये बहुतांश प्रवासी हे तिकीट तपासनिसाने स्वत:हून आरक्षित डब्यात बसविलेले व त्यांच्याकडून दंडाची वसुली केलेले असतात. त्यामुळे वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठीही नियमबाह्य़ उद्योग सुरू असून, लक्ष्य पूर्ण केल्याचे दाखवून स्वत:ची पाठही थोपटून घेतली जाते.