पादचारी सुरक्षेबाबत वाहतूक पोलिसांचा महापालिकेला प्रस्ताव

बेदरकार वाहनचालकांच्या चुकीमुळे गेल्या वर्षभरात ६४ पादचाऱ्यांना जीव गमावावा लागला असून, वाहतूक पोलिसांनी आता पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांवर वाहन शिरण्याच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पादचारी सुरक्षितता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावात प्रामुख्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या वर्षी शहरात वेगवेगळय़ा भागांत झालेल्या अपघातात ६४ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून अपघात स्थळांची पाहणी करण्यात आली. बहुंताश अपघात वाहनचालकांच्या चुकांमुळे झाले असल्याचे, तसेच पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ सुस्थितीत नसल्याचे या पाहणीत आढळून आले. पादचारी पदपथांऐवजी रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे भरधाव वाहनांच्या धडकेने पादचारी मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे एकंदरच पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. पदपथ सुस्थित करणे, पदपथांवरील अतिक्रमणे काढून टाकणे तसेच पदपथांवर वाहने शिरू नयेत म्हणून तेथे दगडी कठडे किंवा लोखंडी जाळी बसवणे, अशा सूचना असलेला प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून महापालिका आयुक्त राव यांना देण्यात आला असल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

ज्या भागात अपघात झाले आहेत, अशा भागांची पाहणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचे वळण आहे, तेथे पदपथ नाहीत, त्यामुळे अशा भागात तातडीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहराच्या मध्यभागात देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे मध्यभागातील अनेक पदपथांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

शिवाजी रस्त्यावर पदपथ आवश्यक

शिवाजी रस्त्यावरील हुतात्मा स्मारक चौक (बुधवार चौक) ते बेलबाग चौक हा भाग सर्वाधिक वर्दळीचा आहे. मध्य भागातील व्यापारी पेठेत मोठय़ा संख्येने नागरिक खरेदीसाठी येतात. त्यामुळे बुधवार चौक ते बेलबाग चौक दरम्यान रस्त्याच्या उजव्या बाजूला चार फूट रुंदीचा पदपथ तयार करणे गरजेचे आहे. बुधवार चौक ते रामेश्वर चौक दरम्यान रस्त्याच्या क डेला मोठय़ा प्रमाणावर पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या भागातील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत. अतिक्रमणे काढल्यास या भागातील कोंडी दूर होईल तसेच पादचाऱ्यांना चालणेदेखील शक्य होईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावात काय?

  • पादचारी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे
  • पदपथांची दुरुस्ती; अतिक्रमणे काढून टाकण्याची सूचना
  • पदपथावर लोखंडी कठडे किंवा जाळय़ा बसवाव्यात
  • मध्य भागातील अतिक्रमणांवर कारवाई गरजेची
  • बाबू गेनू चौक ते काका हलवाई दुकानादरम्यान रस्त्यावर दुभाजक