News Flash

नवस फेडल्यानंतर काही तासांत काळाचा घाला..

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

भावनाकेदारी, साहिल केदारी

केदारी, वरखडे, नांगरे कुटुंबीयांची गणपतीवर नितांत श्रद्धा..पुत्रप्राप्तीसाठी सचिन केदारी आणि त्यांची पत्नी नीलम यांनी गणपतीपुळे येथील श्री गणेशाकडे नवस केला होता..त्यांना मुलगा झाला आणि मुलाचे नामकरण करण्यात आले..प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आल्याने सचिन केदारी यांनी नातेवाईकांबरोबर मुलगा सानिध्य याच्यासाठी केलेला नवस फेडण्याचे निश्चित केले..नवस फेडण्यासाठी ते सहकुटुंबीय गणपतीपुळे येथे गेले.. नवस फेडल्यानंतर काही तासांत काळाने त्यांच्यावर घाला घातला..

सचिन केदारी व मुलगा सानिध्य

गणपतीपुळे येथून कोल्हापूर येथे परतत असताना पंचगंगा नदीच्या पुलाच्या कठडय़ावर आदळून छोटी बस नदीपात्रात कोसळून केदारी, वरखडे, नांगरे कुटुंबातील बाराजण मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला. एकूण तेराजण या अपघातात मृत्युमुखी पडले. तर तीनजण जखमी झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर बालेवाडी आणि मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे शोककळा पसरली. सचिन केदारी, त्यांचे भाऊ दिलीप बालेवाडी परिसरात राहायला आहेत. त्यांची विवाहित बहीण मनीषा वरखडे पिरंगुट आणि छाया नांगरे बालेवाडी परिसरात राहायला आहेत. सचिन केदारी यांचा चारचाकी वाहने भाडय़ाने देण्याचा व्यवसाय आहे. सचिन यांना पहिली मुलगी झाली. त्यानंतर त्यांनी मुलगा होण्यासाठी गणपतीपुळे येथे नवस केला होता.

श्रावणी केदारी

भाचे, पुतणे, विवाहित बहिणी यांच्यासोबत त्यांनी प्रजासत्ताकदिनाच्या सुट्टीनिमित्त गणपतीपुळे येथे नवस फेडण्यासाठी जाण्याचे ठरविले होते. मोटारीतून जाण्याऐवजी छोटी प्रवासी बस भाडेतत्त्वावर घेऊन केदारी, वरखडे, नांगरे कुटुंबीय गुरुवारी रात्री गणपतीपुळे येथे रवाना झाले. गणपतीपुळे येथे पोहोचल्यानंतर सचिन यांनी सपत्नीक नवस फेडला. नऊ महिन्यांचा मुलगा सानिध्य, आठ वर्षांची मुलगी संस्कृती, भाचे, पुतणे असे सर्वजण तेथे होते. नवस फेडल्यानंतर सर्वजण रात्री गणपती पुळ्याहून कोल्हापूरला निघाले. पंचगंगेच्या पुलावर रात्री अकराच्या सुमारास बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस कठडा तोडून नदीपात्रात पडली. नवस फेडल्यानंतर काही तासांत केदारी, वरखडे, नांगरे कु टुंबीयांवर काळाने घाला घातला.

प्रतीक नागरे

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या केदारी, वरखडे, नांगरे कुटुंबीयांतील बाराजणांचे मृतदेह पुण्यात शनिवारी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक आणि आप्तेष्टांना शोक अनावर झाला. सचिन यांचे वडील भरत केदारी, बंधू दिलीप, छाया नांगरे यांचे पती दिनेश नांगरे काही कामानिमित्त गणपतीपुळे येथे गेले नव्हते. कुटुंबातील सदस्य अपघातात मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.

छाया नागरे

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 5:21 am

Web Title: road accident death in maharashtra
Next Stories
1 मागणीप्रमाणे वाढणाऱ्या रेल्वे तिकीट दरांचा धसका!
2 झाडावर मोटार आदळून सहा ठार
3 वीक एंडला वाहतुकीचा खोळंबा; मुंबई- पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा
Just Now!
X