राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व कामगार नेते यशवंत भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगर येथे अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यासाठी भर रस्त्यात मंडप टाकण्यात आला आणि वाहतूक बंद करण्यात आली. या प्रकाराने नागरिकांची विशेषत: वाहनस्वारांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली.
भोसले हे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष असून िपपरी पालिकेचे माजी नगरसेवक आहेत. अलीकडेच ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संत तुकारामनगर येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पुतळ्यापासून शनी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भोसले यांचे संपर्क कार्यालय आहे. गुरुवारी त्यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयासमोर रस्त्यात मंडप उभारण्यात आला होता. सकाळी भोसले यांचे तेथे आगमन झाले. भोसलेंना भेटायला आलेल्या नागरिकांकडून शुभेच्छा दिल्या जाऊ लागल्या. त्याच ठिकाणी टेबल व खुच्र्या टाकण्यात आल्या. आधीच मंडप आडवा टाकल्याने वाहतूक बंद झालीच होती, त्यात नंतर दुचाकी आडव्या लावून उरला सुरला रस्ताही बंद करण्यात आला. त्यामुळे येथून शनी मंदिराकडे, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडे तसेच महात्मा फुलेनगरमार्गे भोसरीकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. त्यांना गल्लीबोळातून नागमोडी वळणे घेऊन पर्यायी रस्ता शोधावा लागत होता. कार्यक्रम झाल्यानंतर तो मंडप बराच वेळ तसाच होता. या संदर्भात, भोसले म्हणाले, कार्यकर्त्यांकडून उत्साहाच्या भरात चूक झाली असेल. मात्र रस्ता बंद करण्याची गरज नव्हती. यापुढे काळजी घेऊ.