‘रिलायन्स’च्या ठेकेदारीत उखडलेल्या; रस्त्याच्या धुराळ्याने श्वसनाचे विकार

रुंदीकरणाच्या कामाच्या नऊ वर्षे विक्रमी रखडपट्टीमुळे खुद्द केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘काळा डाग’ संबोधलेल्या पुणे-सातारा रस्त्यावरील समस्या आणि प्रश्नांची मालिका मोठी आहे. रखडलेले काम, रस्त्यावरील खड्डे, अर्धवट उड्डाण पूल, अपघात आणि वाहतुकीची कोंडी यामुळे वाहन धारक आणि प्रवासी हैराण असताना रस्त्यालगतच्या ग्रामस्थांना निराळ्याच समस्यांचा सामना करावा लागतो आहे. उखडलेल्या रस्त्यावरून वाहने जाऊन उडणाऱ्या धुराळ्यामुळे अनेकांना श्वसनाशी संबंधित त्रास होत आहे. त्याचप्रमाणे याच भागातील हॉटेल व्यवसायावरही धुळीचा मोठा परिणाम झाला आहे.

गल्ली-बोळातील रस्त्यालाही लाजवेल अशी अवस्था सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या पुणे-सातारा रस्त्याची झाली आहे. रखडलेल्या आणि कामे बंद असलेल्या उड्डाण पुलाच्या परिसरात नऊ वर्षांपूर्वीपासूनच सेवा रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. हे सेवा रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यावर मोठमोठाले खड्डे आहेत. त्यात वाहनांचे अपघात होतात. याच भागामध्ये वाहतुकीची कोंडी सातत्याची आहे. टोलचे पैसे देऊनही वाहन चालकांना खड्डय़ात पाठविणाऱ्या ‘रिलायन्स’च्या ठेकेदारीवर तीव्र संताप व्यक्त केला जात असताना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याची सद्य:स्थिती आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांच्या मानसिक छळाबरोबरच स्थानिक ग्रामस्थांबाबत निर्माण झालेल्या समस्याही महत्त्वाच्या आहेत.

वरवे, चेलाडी, किकवी आदी भागांमध्ये सहापदरी उड्डाण पुलांची कामे सात ते आठ वर्षांपासून रखडली आहेत. किकवीतील उड्डाण पुलाचे काम बंदच आहे. या भागात सेवा रस्त्यावरून वाहने जातात. मात्र, याला रस्ता का म्हणायचे, असाच प्रश्न वाहन धारकांना पडतो. बहुतांश भागात रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे रस्त्यावरून जाताना मोठय़ा प्रमाणावर धुराळा उडतो. तो जवळच्या घरांत, दुकानात, हॉटेलात दिवसभर शिरत असतो. दुचाकीस्वारांना तोंडाला रुमाल बांधल्याशिवाय रस्त्याने जाता येत नाही. या धुळीमुळे रस्त्यालगतच्या प्रामुख्याने ज्येष्ठ ग्रामस्थांना श्वसनाचे त्रास जाणवत असल्याचे ग्रामस्थांमी सांगितले. धुळीपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देत असले, तरी व्यवसायामुळे किंवा वास्तव्यामुळे रस्त्यालगत राहावे लागते. सातत्याने धुराळा उडत असल्याने हॉटेलातही येणे ग्राहक टाळतात. त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचेही ग्रामस्थ सांगतात.

नेते येणार असल्यासच तात्पुरती मलमपट्टी

रखडलेल्या उड्डाण पुलांचे काम तातडीने पूर्ण करा किंवा उखडलेले सेवा रस्ते तरी दुरुस्त करा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ सातत्याने करीत असतात. पण, कुणीही लक्ष देत नाही. त्यासाठी एकदा ‘रस्ता रोको’ही केला, पण पोलिसांनी आम्हालाच पकडून नेले, अशी खंत वरवे येथील ग्रामस्थ आण्णा भोरडे यांनी व्यक्त केली. सातत्याने उडणाऱ्या धुराळ्यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवतात. हॉटेलमध्येच नव्हे, तर घरच्या जेवणातही कचकच जाणवते. कोणी एखाद्या पक्षाचा नेता किंवा मंत्री या रस्त्याने येणार असल्यास तातडीने तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दुरुस्त होतो. पण, तो पुन्हा उखडतो. निवडणुकीच्या कालावधीत मुख्यमंत्री या रस्त्याने येणार असल्याने रातोरात रस्ता दुरुस्त केला होता, असेही भोरडे यांनी सांगितले.