खडकीतील मेट्रोचे काम महापालिके ने थांबविले

पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील खडकी परिसरातील रस्ता अरूंद असल्यामुळे तेथे मेट्रो मार्ग झाल्यास वाहतूक कोंडी होणार असल्याचा साक्षात्कार महापालिके ला तब्बल चौदा वर्षानंतर झाला आहे. या रस्त्यावरील मेट्रोच्या भल्यामोठ्या खांबांमुळे भविष्यात पदपथ विकसन आणि प्रस्तावित बीआरटी मार्गासाठी जागाच उपलब्ध होणार नाही, असा दावा करत महापालिके ने खडकीतील मेट्रोचे काम थांबविले आहे. मेट्रोने लगतची शासकीय किं वा संरक्षण विभागाची जागा ताब्यात घ्यावी आणि काम सुरू करावे, अशी भूमिका महापालिके ने घेतली आहे. भूसंपादनाचा शंभर कोटी खर्च अपेक्षित असून तो कोणी करायचा यावरून महामेट्रो आणि महापालिके त वाद सुरू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड-स्वारगेट या मेट्रो मार्गिके अंतर्गत शेतकी महाविद्यालयापर्यंतची मार्गिका उन्नत असून त्यानंतर ती स्वारगेटपर्यंत भुयारी करण्याचे नियोजित आहे. पिंपरी-चिंचवडपासून मेट्रो मार्गिके ची कामे वेगात होत असून खडकी परिसरापर्यंत कामे आली आहेत. उन्नत मार्गिके साठी खांब उभारण्यात आले असून पिंपरी-चिंचवडमधील सहा किलोमीटर अंतराच्या परिसरात मेट्रोची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. हॅरीस पुलापर्यंत मेट्रो मार्गिके चे काम सुरळीत सुरू असतानाच खडकीपासून पुढे रस्ता अरूंद असल्याचा फटका महामेट्रोच्या कामांना बसला. खडकी रेल्वे गेटपासून पुढील ८०० मीटरच्या जागेवरून महामेट्रो आणि महापालिका यांच्यात तिढा निर्माण झाला आहे. या रस्त्यावर महापालिके ने बीआरटी मार्ग प्रस्तावित के ला आहे. हॅरीस पूल ते पाटील इस्टेट असा बीआरटीचा प्रस्तावित मार्ग आहे.

उन्नत मेट्रो मार्गिके साठी रस्त्याच्या मधोमध खांब उभारण्यात आल्यास बीआरटी मार्गासाठी जागाच उपलब्ध  होणार नाही. हा रस्ता जुना मुंबई-पुणे रस्ता असून तो खांबांमुळे आणखी अरूंद होईल. वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे भविष्यात मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल, असा दावा करत महामेट्रोचे काम थांबविण्यात आले आहे. त्यावर या ८०० मीटरच्या भागात मेट्रोचे खांब रस्त्याच्या एका बाजूला घेता येतील, अशी भूमिका महामेट्रोने मांडली. महापालिका आणि मेट्रोमधील हा वाद विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. त्यावर तोडगा निघेल, अशी शक्यता असतानाच नवा वाद उपस्थित झाला आहे.

मेट्रोने लगतची शासकीय किं वा संरक्षण विभागाची जागा संपादित करावी, असे विभागीय आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. महापालिके ने ही जागा संपादित करून द्यावी, असे महामेट्रोने स्पष्ट के ले. त्याला महापालिके ने स्पष्ट नकार दिला आहे. भूसंपादनासाठी शंभर कोटींचा खर्च अपेक्षित असून महामेट्रोनेच त्यांच्या स्तरावर भूसंपादन करून काम सुरू करावे, असे महापालिके ने पत्र दिले आहे. त्यामुळे सध्या ८०० मीटर अंतरातील काम थांबले आहे.

स्थानकाची जागाही पुढे ढकलली

खडकी परिसरातील मेट्रो स्थानकालाही अरूंद जागेचा फटका बसला आहे. खडकी रेल्वे गेटजवळच मेट्रोचे स्थानक प्रस्तावित होते. त्या जागेत बदल करण्यात आला असून खडकी स्थानकाच्या पुढे काही अंतरावर स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड ही मार्गिका १६ किलोमीटर लांबीची आहे. यामध्ये काही उन्नत स्थानके  तर काही भूमिगत स्थानके  आहेत. मात्र कामावरून वाद सुरू झाल्यामुळे मेट्रोचे काम नियोजित वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.