निधी खर्च करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ

पुणे : प्रभागात विविध कामे करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी अंदाजपत्रकात असलेली तरतूद संपविण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, विरंगुळा केंद्रांची उभारणी, वाहिन्यांची दुरुस्ती, पदपथांचे सुशोभीकरण अशी कामे सर्रास सुरू झाली आहेत. अंदाजपत्रकातील निधी वाया जाईल, या भीतीपोटी कामांचा धडाका सुरू झाला आहे. त्यामुळे पुढील काही महिने शहरात सर्वत्र खोदाई सुरू असल्याचे चित्र दिसणार आहे.

महापालिकेचे नवे आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. १ एप्रिलपासून नव्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या अंदाजपत्रकातील निधी खर्ची पाडण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. अंदाजपत्रकात नगरसेवकांना प्रभागात विविध प्रकारची कामे करण्यासाठी निधी दिला जातो. त्याला महापालिकेच्या परिभाषेत सभासद यादी (स यादी) असे म्हटले जाते. हा निधी आर्थिक वर्ष पूर्ण होण्याआधी वापरला नाही तर तो वाया (लॅप्स) जाण्याची भीती असते. त्यामुळेच आता सर्वत्र विकासकामे सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

वास्तविक महापालिकेच्या मुख्य खात्याबरोबरच क्षेत्रीय कार्यालयाकडूनही काही कामे केली जातात. नगरसेवकांना मिळालेला निधी खर्च करण्यासाठी केवळ सव्वा महिना शिल्लक आहे. त्यामुळे रस्त्यांचे काँक्रिटीकरण, जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती, नव्याने वाहिन्या टाकणे, विरंगुळा केंद्र, वाचनालय उभारणे, समाजमंदिरांची उभारणी आणि त्यांची रंगरंगोटी, अंतर्गत रस्त्यांची दु्नॠस्ती, पदपथांचे सुशोभीकरण अशी कामे सध्या जागोजागी सुरू झाल्याचे चित्र आहे. याच प्रकारच्या कामांच्या निविदा काढण्यासाठीही नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कामे नव्या आर्थिक वर्षांतही करता येणे शक्य ठरणार आहे. मात्र त्यासाठी काही ठिकाणी उधळपट्टीही होणार आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरणावर सर्वाधिक खर्च होणार असून तसे प्रस्ताव स्थायी समितीला सादर होण्यास सुरुवात झाली आहे.

प्रभागासाठी कोटय़वधींचा निधी

सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना दरवर्षी किमान पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी दिला जातो. तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना तीन ते चार कोटी रुपयांचा निधी मिळतो. या निधीतून प्रभागात कामे केली जातात. सध्याची चार सदस्यीय प्रभाग पद्धती लक्षात घेता एका प्रभागासाठी किमान बारा कोटी रुपयांचा निधी दरवर्षी प्राप्त होतो. याशिवाय अंदाजपत्रकातील प्रकल्प, योजनांसाठीचा निधीही प्रभागातील कामांसाठी घेतला जातो. तशा काही प्रस्तावांना यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.