रस्त्यांची उंची वाढल्याने वीजपेटय़ा खड्डय़ात

शहरात थोडक्या कालावधीतही मुसळधार पाऊस झाल्यास बहुतांश रस्ते तुंबत असल्याचे चित्र यंदा अनेकदा समोर आले आहे. याच रस्त्यालगत असलेल्या वीजपेटय़ांमध्येही (फीडर पिलर) पाणी शिरत असल्याने वीज पावसात विजेची समस्या गंभीर होत आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने रस्त्यांची उंची वाढली. मात्र, पूर्वीपासून या रस्त्यालगत असलेल्या बहुतांश वीजपेटय़ा खड्डय़ात गेल्या आहेत. त्यामुळे किरकोळ पाऊस झाला, तरी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत.

पुणे शहराने यंदाच्या पावसाळ्यात भीषण पूरस्थिती अनुभवली. हंगामात अनेकदा मुसळधार सरी कोसळल्या. २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात नागरिकांचा बळीही गेला आणि हजारो वाहने पाण्यात वाहून गेली. या पुरामध्ये अनेक ठिकाणी वीजयंत्रणाही वाहून गेल्याने काही ठिकाणी दोन ते तीन दिवस वीजपुरवठा बंद होता. यंत्रणाच वाहून गेल्यानंतर वीजपुरवठा बंद होण्याची बाब समजण्यासारखी आहे. मात्र, अगदी हलका पाऊस झाल्यानंतरही वीज बंद होत असल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचे प्रमुख कारण रस्त्यालगतच्या वीजपेटय़ा असल्याची बाब समोर आली आहे.

ट्रान्सफार्मरमधून प्रत्यक्षात ग्राहकांकडे वीजपुरवठा करण्यासाठी वीजपेटय़ा अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यातील वीजवाहिन्यांच्या माध्यमातून विजेच्या वितरणाचे नियंत्रण केले जाते. शहरातील बहुतांश वीजपेटय़ा रस्त्यालगत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे. त्यामुळे पूर्वीपासून याच रस्त्यावर असलेल्या वीजपेटय़ांची उंची कमी झाली आहे. अनेक ठिकाणी त्या खड्डय़ात आहेत. पावसात रस्त्यावरून वाहणारे पाणी वीजपेटय़ांच्या खड्डय़ात साचल्यास आणि ते वाहिन्यांमध्ये शिरल्यास वीज पुरवठा खंडित होतो. यंदाच्या पावसाळ्यात अनेकदा असे प्रकार झाले असल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला. गेल्या दोन वर्षांपूर्वी रस्त्यालगतच्या वीजपेटय़ांची उंची वाढविण्याचे काम हाती घेणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झाले नसल्याचे वास्तव आहे.

काँक्रिटीकरणामुळे वीज वाहिन्यांचे नुकसान

रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना पालिकेकडून महावितरण कंपनीशी कोणताही समन्वय साधला जात नाही. महावितरणकडून याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. रस्त्याखालून गेलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा त्या बदलणे आवश्यक असल्यास पूर्वी डांबरी रस्त्याचे खोदकाम करता येत होते. आता सिमेंटच्या रस्त्याखालील वाहिन्यांत काही बिघाड झाल्यास रस्ते खोदता येत नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी चांगल्या अवस्थेत असलेल्या वीजवाहिन्या रस्त्याखालीच सोडून देत नव्याने दुसऱ्या बाजूने वाहिन्या टाकाव्या लागल्या असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.