आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात पोलिसांकडून अनेक ठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांच्या आणि संशयास्पद व्यक्तींच्या तपासण्या केल्या जात आहेत. यासाठी पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये दरोड्याचा तयारीत असलेल्या पाच जणांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, केशव सूर्यवंशी, मनोज थिटे, रणजित लोखंडे, आकाश चव्हाण आणि भागवत कुंभारे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दिघी पोलीस आणि निवडणूक विभागाच्या स्टॅटिक सर्वेलन्स पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून २ गावठी पिस्तुलासह ५ जिवंत काडतुसे, मिर्ची पूड, दोरी, लाकडी दांडके असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी स्टॅटिक सर्वेलन्स पथकाने देखील गस्तीवर आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास दिघीच्या मॅगझीन चौकात या आरोपींना चारचाकी वाहनातून जात असताना थांबविण्यात आले. त्यांची हालचाल संशयास्पद असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करीत झडती घेतली.

दरम्यान, आरोपी लक्ष्मण याच्याकडे सुरी आढळून आली. तर मनोजकडे एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली. रणजितकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे तर आकाशकडे नायलॉनची दोरी आणि मिर्ची पूड सापडली. गाडीच्या डिक्कीमध्ये दोन लाकडी दांडकेही पोलिसांना मिळाली आहेत. हे सर्व जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या पाचही जणांवर दिघी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.