अडीच तासांत सोळा घरफोडय़ा ल्ल २८ लाखांचा ऐवज लंपास
एरंडवणे आणि डेक्कन परिसरात बुधवारी मध्यरात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. अडीच तासात चोरटय़ांनी वेगवेगळ्या सोसायटय़ांमधील चौदा सदनिका आणि दोन दुकाने फोडून सत्तर तोळे सोन्यासह २७ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. एकापाठोपाठ चौदा सदनिकांमध्ये चोरी झाल्याने रहिवाशी भयभीत झाले असून पोलीस चक्रावून गेले आहेत. या प्रकरणी अलंकार आणि डेक्कन पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एरंडवणे परिसरातील मनोहर अपार्टमेंट, शांतीवर्धन सोसायटी, अखिल हाऊसिंग सोसायटी, रसिक हाऊसिंग सोसायटी, प्रतीक सोसायटी आणि हिमगंगा सोसायटी या सोसायटय़ांमधील सोळा सदनिका फोडून चोरटय़ांनी ऐवज लांबविल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. उमेश अशोक सोनार (वय २८, रा. प्रतीक सोसायटी), कुमुदिनी मधुसुदन केळकर (रा. शांतीवर्धन सोसायटी), जाई भिडे यांनी या संदर्भात वेगवेगळ्या फिर्यादी अलंकार पोलीस ठाण्यात दिल्या आहेत, तर प्रकाश मधुसुदन कारखानीस (रा. अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुधवारी मध्यरात्री चोरटे मोटारीतून प्रभात रस्ता परिसरात आले. त्यांनी आनंदमाई इमारतीतील कारखानीस यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून १६ हजार ६५० रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर चोरटय़ांनी प्रमोद लक्ष्मण पाठक यांचे सुजाता कॉम्प्युटर्सचे कार्यालयाचे कुलूप तोडले. या कार्यालयात चोरटय़ांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. तेथून चोरटे एसएनडीटी महाविद्यालय आणि दशभुजा गणपती मंदिर परिसरात मोटारीने आले. तेथील पाच सोसायटय़ांमधील बंद सदनिकांची कुलुपे तोडली. केळकर यांच्या सदनिकेतून चार लाख ५२ हजारांचा ऐवज लांवबिला. त्यामध्ये सातशे युरो या परकीय चलनांचा समावेश आहे. प्रतीक सोसायटीतील रहिवाशी उमेश सोनार यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी त्यांच्या घरातून सत्तर तोळ्यांचे दागिने आणि तीन लाखांची रोकड असा बावीस लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. भिडे यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून ८७ हजार ५४० रुपयांची रोकड लंपास केली. मनोहर अपार्टमेंट, अखिल हाऊसिंग सोसायटी, रसिक सोसायटी, हिमगंगा सोसायटीतील सदनिका फोडण्यात आल्या. मात्र, या सोसायटय़ांमधील सदनिकांमध्ये चोरटय़ांच्या फार काही हाती लागले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ज्या सोसायटय़ांमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. तसेच रखवालदारदेखील नव्हते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यास सुरुवात केली आहे. काही सोसायटय़ांमध्ये लोखंडी प्रवेशद्वारदेखील नाही.
– परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ