रिक्षाप्रवाशांना लुटणारी परप्रांतीय चोरटय़ांची टोळी गजाआड

शहरातील बेकरीत काम करणाऱ्यासाठी आलेल्या उत्तरप्रदेशातील बेकरी कामगारांनी रात्री रिक्षा चालविण्यास सुरूवात केली. स्वारगेट परिसरात भाडेतत्त्वावर घेतलेली रिक्षा चालवून दिवसा पुन्हा बेकरीत काम करायचे. त्यानंतर या बेकरी कामगारांनी रिक्षा प्रवाशांना लुटण्याचे गुन्हे सुरू केले. स्वारगेट परिसरात आलेल्या प्रवाशांना सोडण्याचा बहाणा करून निर्जनस्थळी रिक्षा थांबवयाची. प्रवाशाला लुटून ते पसार व्हायचे. गेल्या काही दिवसात अशा प्रकारचे गुन्हे वाढल्याने पोलिसांकडून स्वारगेट भागात नजर ठेवण्यात आली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांना खडक पोलिसांकडून गजाआड करण्यात आले. त्यांच्याकडून प्रवाशांना लुटण्याचे आठ गुन्हे उघड झाले असून रोकड, मोबाइल संच, दुचाकी वाहने असा दोन लाख साठ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

याप्रकरणी रिक्षाचालक नवाजीश नाजीर अन्सारी (वय १९, सध्या रा. जनता वसाहत, पर्वती), साथीदार उमेर जाकीर अन्सारी (वय १९, सध्या रा. मुस्कान बेकरी, दत्तवाडी), आफताब सल्लाउद्दीन अन्सारी (वय १९, सध्या रा. सिमला बेकरी, भोपळे चौक, लष्कर, तिघे मूळ रा. बिजनौर, उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली. सांगली जिल्ह्य़ातील लाडेगाव येथे राहणारा शुभम बाबासाहेब पाटील (वय १९) हा पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त गावी गेला होता. रविवारी (२२ ऑक्टोबर) तो गावाहून पुण्यात आला. स्वारगेट एसटी स्थानकात उतरल्यानंतर तो खराडी भागात असलेल्या घरी निघाला होता. शुभम आणि त्याच्या मित्रांनी खराडी भागात भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. शंकरशेठ रस्त्यावर तो रिक्षाची वाट पाहत थांबला होता. त्या वेळी रिक्षाचालक नवाजीश आणि त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी त्याला हडपसर येथे सोडण्याचा बहाणा केला.

काही अंतरावर शुभमला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड लुटून रिक्षाचालक अन्सारी आणि त्याचे साथीदार पसार झाले. घाबरलेल्या शुभमने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर खडक पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी स्वारगेट भागात पाळत ठेवली होती. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक अन्सारी आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी मध्यरात्री प्रवाशांना लूटण्याचे आठ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी शिर्के, सहायक निरीक्षक विष्णू केसरकर, उपनिरीक्षक संजय गायकवाड, विश्वनाथ शिंदे, अनिकेत बाबर, आशीष चव्हाण, संदीप कांबळे यांनी ही कारवाई केली.

लूटमारीतून मिळालेले पैसे छानछौकीवर

रिक्षाचालक नवाजीश अन्सारी आणि त्याच्या साथीदारांनी रोहित धनाजी चव्हाण (वय २०, सध्या रा. डेक्कन, मूळ रा. उस्मानाबाद), वैभव सुनील गोरे (वय २४, रा. कोरेगाव पार्क) यांना लुटल्याचे तपासात उघड झाले आहे. अन्सारी आणि त्याच्या साथीदारांनी लूटमारीतून मिळालेले पैसे कपडे तसेच दारू पाटर्य़ावर खर्च केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.