22 November 2019

News Flash

उद्योगनगरीत सराफ लक्ष्य

टेहळणी करून नियोजनबद्ध पध्दतीने लूट

(संग्रहित छायाचित्र)

उद्योगनगरीत सोन्या-चांदीचा व्यवसाय करणारे सराफ लुटारूंचे लक्ष्य बनले आहेत. शहरातील अलीकडच्या काही घटना पाहता सराफांच्या दुकानांवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडे पडले असून त्यांच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला आहे. टेहळणी करून लुटण्याचे तंत्र वापरताना पिस्तुलाचा सर्रास वापर झाल्याचे आढळून येते.

निगडीत मे महिन्यात घडलेल्या घटनेत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुपारी ग्राहक कमी असल्याचे हेरून सराफ पेढीवर हल्ला चढवला. सराफाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी दुकानातील ऐवज घेऊन पोबारा केला. तत्पूर्वी आरोपींनी परिसराची पाहणी केली होती.

मार्च महिन्यात रहाटणीत भर वस्तीतील पुणेकर ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता. दुकानात गर्दी कधी नसते, सीसीटीव्ही आहे का, सायरन वाजतो का, पळण्यासाठी सोयीस्कर मार्ग कोणते आदींची पाहणी करून सातजणांनी दुकानातील तीन किलो सोन्यासह ९० लाखाचा ऐवज चोरून नेला होता. दुकानदारावर गोळी झाडणाऱ्या आरोपींनी जाताना सीसीटीव्हीचा सेटही पळवून नेला होता. गेल्या १४ फेब्रुवारीला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एक कोटी रुपये किमतीचा ऐवज घेऊन चाललेल्या एका ब्रोकरला लुटण्यात आले होते. देहूरोड येथे न्याहारीसाठी तो थांबला असताना दुचाकीवरून तीनजण आले. त्यांनी बॅग घेऊन पोबारा केला. पोलिसांनी परराज्यात जाऊन आरोपी पकडले. मात्र, पूर्ण माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

सराफच लक्ष्य का?

* चांगला ऐवज मिळण्याची आरोपींना खात्री

* चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावता येते

* काही सराफी दुकानांमध्ये सुरक्षाविषयक बाबींचा अभाव

* टेहळणी करून दिवसाढवळ्या दरोडे

सराफांच्या दुकानात लूट करण्यामागे गुन्हेगारांची अधिक पैसे मिळवण्याची मानसिकता असते. सोन्याची विल्हेवाट लावता येते. त्यामुळेच नियोजनबध्दरीत्या सराफांना लक्ष्य केले जाते. सराफांनी सुरक्षिततेविषयक आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

– स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त

First Published on June 13, 2019 12:52 am

Web Title: robbery in a planned manner
Just Now!
X