16 October 2019

News Flash

गणित ऑलिम्पियाडमध्ये रोहिणी जोशीला रौप्य पदक

युक्रेनमध्ये नुकतीच ही ऑलिम्पियाड झाली.

मुलींना गणितात संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने होणाऱ्या युरोपीय महिला गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्यपदक मिळवण्यात यश आले. पुण्यातील रोहिणी जोशी या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने ही कामगिरी केली. हे पदक मिळवणारी रोहिणी पहिली भारतीय ठरली.

युक्रेनमध्ये नुकतीच ही ऑलिम्पियाड झाली. भारताने २०१५ पासून या स्पर्धेत सहऊागी व्हायला सुरुवात केली. आतापर्यंत भारताने कांस्य पदक मिळवले होते. यंदा पहिल्यांदाच भारताला रौप्य पदक मिळाले आहे. यंदा रोहिणीसह तेलंगणा येथील व्ही. साई, नवी दिल्ली येथील अनुष्का अग्रवाल या दोन विद्यार्थिनींनीही कांस्य पदक प्राप्त केले.

स्पर्धेत जगातील ५० देशांतील १९६ विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय संघाचे नेतृत्व पंजाब विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक व्ही. के. ग्रोव्हर यांनी केले. भारतीय संघ रविवारी भारतात परतणार आहे, अशी माहिती होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राकडून देण्यात आली.

गणितातच करिअर

रोहिणीला लहानपणापासून संशोधनाची आवड आहे. त्यामुळे तिने गणित क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले आहे. सध्या ती बारावीत शिकत आहे. मात्र, ठरवून जेईईची परीक्षाही दिली नाही. भविष्यात गणितात संशोधन आणि अध्यापन करण्याचा तिचा मानस आहे. या कामगिरीमुळे तिचे मनोबल उंचावेल, असे तिची आई अनुराधा जोशी यांनी सांगितले.

First Published on April 14, 2019 5:52 am

Web Title: rohini joshi silver medal in math olympiad