तानाजी काळे

रणरणत्या पठारी प्रदेशात चाळीस वर्षांपूर्वी विसावलेला उजनी जलाशय हा तसा मूळचा ‘राकट’ स्वभावाचा. पण, आता पाण्याच्या विपुलतेने परिसराने हिरवा शालू पांघरलेला असतानाच, अथांग पाण्यातील नीरव शांततेचा भंग करीत येथील पाण्यावर अग्नीचे निखारे आणि आसमंतातील ‘ज्वाला’ येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या वर्षी उजनी जलाशयावर पाण्याची अधिक उपलब्धता असल्याने रोहित पक्षी काहीसे उशिराने दाखल झाले. मात्र, त्यांच्या अस्तित्वाने नीरव शांततेत उजनी जलाशयावर खुले नैसर्गिक युद्ध सुरू झाले आहे. हा या पक्ष्यांचा जगण्याचा, अस्तित्व टिकवण्याचा एक प्रवास असतो. परंतु, त्यांच्या येण्याने उजनी जलाशयावर पाण्यात आणि आसमंतातही कवायती आणि युद्धसदृश परिस्थिती पहायला मिळत आहे.

‘अग्निपंख’ हे त्या पक्ष्याचे नाव. मराठीमध्ये रोहित तर इंग्रजीत ‘फ्लेमिंगो’ या नावाने तो परिचयाचा. ३५-४० वर्षांपासून न चुकता उजनी जलाशयावर हक्काचा पाहुणचार घेण्यासाठी येणाऱ्या या पक्ष्यांच्या कवायती जलाशयावर दिसत आहेत. या कवायती पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची पावले भल्या सकाळी आणि सायंकाळी उजनी जलाशयाकडे वळू लागली आहेत.

रोहित पक्ष्यांची शिस्त आणि चाल सैनिकांप्रमाणेच असल्यासारखे दिसते. पाण्यात चालतानाही सैनिकी रुबाब? असतो. पाण्यात बाकदार चोचीने ते अन्न शोधतात. सर्वाच्या माना एकदम खाली असतात. त्यांच्या दिनचर्येत थोडा अडथळा आला किंवा काही धोका वाटला तर त्यांचा म्होरक्या ‘व्हाक-व्हाक’ असा आवाज करतो. तो आवाज येताच सर्वाच्या माना एकदम वर होतात. एकूण परिस्थितीचा अंदाज घेत पाण्यात थोडे समांतर पंख उंचावत कदमताल करीत यांची तिरकी चाल सुरू होते. या स्थितीत तर पाहणाऱ्याला पाण्यावर निखारे असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

या अग्निपंखांच्या जोडीला कंठेरी चिखल्या, शेकाटय़ा, राखी बगळे, चित्रबलाक या पक्ष्यांच्या बटालियनही येथे आल्या आहेत.

उजनी जलाशयावर अग्निपंख म्हणजेच रोहित पक्ष्यांच्या कवायती निसर्गप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत.