करोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने ताठर भूमिका घेतली आहे. १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्याची मागणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) पंतप्रधानांकडे केली असताना, प्राधान्यगटांनाच लस देण्यात येत असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता १८ वर्षांवरील सर्वांसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण खुले करण्याची मागणी ‘आयएमए’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. १८ वर्षांवरील लस घेण्यास इच्छुक सर्वांना (वॉक इन) लस देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करावे असेही ‘आयएमए’ने आपल्या पत्रात नमूद के ले आहे. खासगी क्षेत्रातील लहान दवाखान्यांनाही करोना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घ्यावे, त्यामुळे मोठ्या लोकसंख्येला लशीची उपलब्धता लवकरात लवकर होऊ शके ल, अशी सूचनाही ‘आयएमए’ने केली आहे.

या मुद्याकडे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांचे लक्ष वेधण्यात आले. राजेश भूषण म्हणाले की, पाश्चिमात्य देशांमध्येही टप्प्याटप्प्याने लसीकरण होत आहे. ‘लसीकरणाचा एक उद्देश मृत्यू कमी करणे आणि दुसरा उद्देश आरोग्ययंत्रणेला वाचवणे हा आहे. यासाठीच आरोग्यसेवकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात आले. ज्यांना हवी आहे अशांचे लसीकरण हा आमचा उद्देश कधीच नव्हता. ज्यांना गरज आहे, त्यांच्यासाठी लसीकरण आहे,’ असे भूषण यांनी सांगितले. व्यापक प्रमाणात लस दिल्यास समूह प्रतिकारशक्ती वाढते असे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. लसीकरणामुळे मृत्यूंचे प्रमाण, संसर्गाच्या तीव्रतेचे प्रमाण घटते हे सिद्ध झाल्यामुळेच प्राधान्यगटांना लस दिली जात आहे, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

राज्यात करोनाचे ५५,४६९ नवे रुग्ण

मुंबई : राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, मंगळवारी ५५ हजार ४६९ नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात २९७ रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ७२ हजार झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबई १०,०३०, पुणे शहर ६,५८८, पिंपरी-चिंचवड २,७६६, उर्वरित पुणे जिल्हा १,६८६, नाशिक शहर २,८३९, नगर जिल्हा १,९४९, जळगाव जिल्हा १,३८१, सातारा ५०७, बीड ७४१, नांदेड १,३५३, नागपूर शहर २६६८, उर्वरित नागपूर जिल्हा १०८५ नव्या रुग्णांची नोंद झाली.

‘आयएमए’ म्हणते…

देशातील झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी आणि मोठ्या लोकसंख्येमध्ये समूह रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण करण्यासाठी अधिकाधिक जनतेचे लसीकरण करणे हा एकमेव शास्त्रीय उपाय आपल्या हाती आहे. सध्या वाढणाऱ्या रुग्णांमध्ये २० वर्षांवरील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांचे वेगवान लसीकरण होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने लसीकरण १८ वर्षांवरील सर्वांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी ‘आयएमए’ने पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे.

आगामी चार आठवडे निर्णायक

नवी दिल्ली : देशात करोनाची स्थिती अत्यंत बिकट बनू लागली असून, पहिल्या लाटेपेक्षा यावेळी रुग्णांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. रुग्णवाढीचा वेग ही चिंताजनक बाब असून करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पुढील चार आठवडे अत्यंत कळीचे आहेत, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व करोना कृतिगटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिला.