बनावट कागदपत्रांच्या आधारे २०.४४ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याबाबत कॉसमॉस बँकेच्या तक्रारीवरून ‘रोझरी एज्युकेशन ग्रुप’ विरोधात लष्कर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉसमॉस बँकेने केलेल्या तक्रारीनुसार, रोझरी एज्युकेशन ग्रुपने बँकेच्या लष्कर विभागातील शाखेकडून वेगवेगळ्या प्रकारे ४६.५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यातील २०.४४ कोटी रुपयांचे कर्ज मिळविताना संस्थेच्या भागीदारांनी तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या मालकीची १८,४४० चौरस मीटरची जमीन बिगरशेती असल्याची कागदपत्रे तारण म्हणून दाखल केली होती.
बँकेच्या चौकशी प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी व तळेगाव तलाठी यांच्याकडून बँकेने संबंधित कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती मिळविल्या. त्यातून संबंधित जमिनीचे सात बाराचे उतारे व बिगरशेती आदेश बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कर्ज मिळविण्यासाठी बनावट कागदपत्र सादर करून दिशाभूल केल्याची तक्रार बँकेच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली. त्यानुसार लष्कर पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४६७, ४७१, १८० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापनाशी संपर्क होऊ शकला नाही. सहायक पोलीस निरीक्षक जी. आर. भापकर या प्रकरणी तपास करीत आहेत.