डच गुलाबाचे दर तेजीत; सात हजार गुलाब गड्डींची आवक

रंग  व्हॅलेन्टाइनचे :- पुणे : व्हॅलेंटाईन डेसाठी मार्केटयार्डातील फूल बाजारात गुलाबाची आवक वाढली असून रंगीबेरंगी गुलाबांमुळे फूल बाजार बहरला आहे. बाजारात बुधवारी मावळ तसेच जिल्ह्य़ाच्या अन्य भागांतून सात हजार २९३ गुलाब गड्डींची आवक झाली. घाऊक बाजारात डच गुलाबाच्या गड्डीचे दर तेजीत असून गुलाबाच्या वीस काडय़ांच्या एका गड्डीला १५० ते २२० रुपये असा दर मिळाला आहे.

व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमदिनासाठी युवक-युवतींकडून गुलाबांना मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांत व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाबाला मागणी वाढत असून मावळ तालुक्यातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर गुलाबाची लागवड करतात. विविध रंगी डच गुलाबांना मोठी मागणी असते. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फूल बाजारात गुरुवारी (१३ फेब्रुवारी) गुलाबाची आवक आणखी वाढेल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूलबाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.

साध्या गुलाबाच्या तुलनेत डच गुलाबांना मोठी मागणी असते. मंगळवापर्यंत घाऊक बाजारात गुलाब गड्डीला १२० रुपये असा दर मिळाला होता. पुढील दोन दिवसात मागणी वाढल्यानंतर दरात वाढ होईल. एरवी डच गुलाबाच्या दोन ते अडीच हजार गड्डींची आवक बाजारात होत असते, असे त्यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी अवेळी झालेला पाऊस तसेच हवामानातील बदलांचा परिणाम गुलाब लागवडीवर झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाब गड्डींची आवक कमी झाली. घाऊक फूल बाजारात वीस काडय़ांच्या डच गुलाबाच्या गड्डीला १५० ते २२०  रुपये असे दर मिळाले. गुरुवापर्यंत गुलाबगड्डीचे दर तेजीत राहतील. त्यानंतर दर कमी होतील, असे फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.