अभिनय करताना जो स्वत:ला हरवतो आणि भावनावश होतो, तोच खऱ्या अर्थाने जिवंत अभिनय साकारत असतो. अभिनयामध्ये केवळ शब्दाला नाही, तर भावनेला महत्त्व असते. त्यातूनच उत्तम कलावंताचे प्रतिबिंब दिसून येते, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन तर्फे ज्येष्ठ गायक-संगीतकार श्रीधर फडके आणि अभिनेते सुबोध भावे यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. क्लबचे अध्यक्ष किशोर आदमणे, सचिव राजेश राऊत, संचालक सच्चिदानंद रानडे या वेळी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे यंदा ४१ वे वर्ष आहे.
पुरस्काराला उत्तर देताना भावे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वेचले. त्यांना प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान होते. परंतु त्यांनी त्याचा व्यावसायिकदृष्टय़ा फायदा करून घेतला नाही. ‘लोकमान्य.. एक युगपुरुष’ या चित्रपटाच्या माध्यमातून  लोकमान्य टिळक मला जवळून अभ्यासायला मिळाले. आयुष्य घडवताना आपल्यावर झालेले संस्कार आणि आपण कोणाला आदर्श मानतो, यावर जीवनाचे यश अवलंबून असते. त्यामुळे कला ही संस्काराने बहरते.
फिटे अंधराचे जाळे, देवाचिये द्वारी, भोगिले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले, ओंकार स्वरूपा ही गीते सादर करून श्रीधर फडके यांनी उपस्थितांची मने जिंकली. चित्रपट सृष्टीत काम करताना आलेले अनुभव आणि मागील दहा वर्षांतील गाण्यांचा प्रवास त्यांनी सुमधुर स्वरांच्या माध्यमातून या वेळी उलगडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव यांनी केले. सच्चिदानंद रानडे यांनी आभार मानले. किशोर आदमणे यांनी प्रास्ताविक केले.