भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेत आहे असा आरोप करण्यापेक्षा पक्षातील नेते सांभाळावेत असा सल्ला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिला आहे. “मीच त्यांना सोडले आहे, मग बाकीचे तरी कसे राहतील, ” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकारांशी बोलत होते.

“शरद पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत चांगले नेते आहेत. त्यांनी समाजातील अनेक चांगली काम केली आहेत. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांना आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून येणे कठिण वाटत आहे,” असे आठवले यावेळी म्हणाले. तसेच पक्ष बदलला तर सत्ता आणि आमदारकी राहू शकते ही भावना कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची चुकीची नाही. देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे, असे म्हणत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची आठवले यांनी पाठराखण केली.

“सध्या राज्यात पक्षांच्या नेत्यांच्या दौऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. सगळ्यांनी आपापला प्रचार करावा, तसेच एकमेकांवर खोटेनाटे आरोप करू नयेत. पक्षासाठी मत मागावीत. शिवसेना, भाजपा आणि रिपाइं एकत्र असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५० च्या वर जागा मिळणार नाहीत. तसेच रिपाइंला १० जागा मिळाल्या पाहिजेत,” असे आठवले यांनी स्पष्ट केले.