काँग्रेस व राष्ट्रवादीसमवेत आम्ही होतो, तेव्हा त्यांनी आमची पुरेपूर फसवणूक केली. आता महायुतीत तसा अनुभव येऊ नये, अशी सूचक टिपणी करत रिपाइंने पिंपरी राखीव मतदारसंघावर यापूर्वी सांगितलेला दावा कायम ठेवला आहे.
रिपाइं ब्रिगेडच्या पिंपरी शहराध्यक्षपदी जयेश पिल्ले यांची नियुक्ती करण्यात आली, त्याची घोषणा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, पक्षाच्या सरचिटणीस व नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत यांनी पत्रकार परिषदेत केली. सध्या पिंपरी मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यावर रिपाइंचा डोळा असून सोनकांबळे प्रबळ दावेदार आहेत.
सोनकांबळे म्हणाल्या, शहरातील मतदारसंघाची सेना-भाजपमध्ये वाटणी झाली आहे. मात्र, रिपाइंला पिंपरी मतदारसंघ हवा असून पक्षाने यापूर्वी केलेली मागणी कायम आहे. गेल्या वर्षी रिपाइंने पिंपरीत निवडणूक लढवली होती. या ठिकाणी दलितांचे हक्काचे मतदान आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात पिंपरी सुटला पाहिजे. यापूर्वी दोन्ही काँग्रेसने आम्हाला फसवले आहे, तशी फसवणूक महायुतीने करू नये. पिंपरीच्या मागणीसाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे आग्रह धरणार असून उमेदवारीचा निर्णयही तेच घेणार आहेत. जागा रिपाइंला सोडून तेथे बंडखोर उभा करण्याची खेळी झाल्यास अन्य मतदारसंघांत प्रत्युत्तर दिले जाईल.