जिल्ह्य़ात साडेसतरा हजार कोटींची कामे; विकासकामांना जमीन अधिग्रहणाचा अडथळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया-एनएचएआय) एका वर्षांत जिल्ह्य़ात तब्बल साडेसतरा हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. यापैकी साडेबारा हजार कोटी रुपयांची महामार्गाची कामे आगामी काळात करण्यात येणार असून साडेपाच हजार कोटींच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. प्रस्तावित महामार्गाचा सविस्तर प्रकल्प (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट-डीपीआर) अहवालही तयार करण्यात आला आहे. परंतु, नवे महामार्ग तयार करणे आणि अस्तित्वात असलेल्या महामार्गाची रुंदी वाढविण्याकरिता जमीन अधिग्रहण हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. निधी उपलब्ध असूनही केवळ जमीन अधिग्रहणाकरिता ही कामे रखडण्याची चिन्हे आहेत.

वासुंदे, बारामती ते फलटण हा पंचवीस किलोमीटरचा तीनशे कोटी रुपयांचा रस्ता, पुणे-नाशिक विभागांतर्गत एनएच सोळा नाशिक फाटा सीमा ते खेड सहापदरी मार्गाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या मार्गाकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका बारा कोटी रुपयांचा निधी देणार असून जमीन अधिग्रहणाची जबाबदारीही महापालिकेकडे आहे. हा प्रकल्प बावीस कि.मी.चा असून त्याकरिता एनएचएआय ८५० कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे.

रायगड-पुणे महामार्ग आणि रायगड ते पुणे जिल्हा सीमेवरील शिरवळ, लोणंद, सातारा हा १२८ कि.मी. रस्त्याचा डीपीआर तयार झाला आहे. त्याकरिता बाराशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एनच चार चाकण, शिक्रापूर, चौफुला जंक्शन हा १६० कि.मीच्या रस्त्याकरिता अठराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भीमाशंकरचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होण्याकरिता १३८ कि.मीचा १ हजार कोटींच्या रस्त्याचा डीपीआर पूर्ण करण्यात आला आहे.

आर्थिक विकासांतर्गत सातारा रस्ता, कडेफाटा एनएच नऊ चौफुला-सोलापूर रस्ता, वाडेफाटा, लोणंद, सुपा-तळेगाव या ५६ कि.मी रस्त्याचे ४४८ कोटींचे काम मंजूर झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून नगर, बारामती, फलटण एनएच १६१ हा नगर ते वासुंदे फाटा दोनपदरी ९४ कि.मीच्या काँक्रीट रस्त्यासाठी ५५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पुणे, मुळशी, माणगाव, माळसा हा तीनशे कोटींच्या रस्त्याचा डीपीआर पूर्ण झाला असून जमीन अधिग्रहण सुरू आहे. मुंबई-गोवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून त्याला मुंबई-पुणे रस्त्याला हा मार्ग जोडला जाणार आहे.

एनएच ६१ जंक्शन हा २८० कोटींचा आणि वडगाव, कात्रज, कोंढवा, मंतरवाडी, लोणीकाळभोर, लोणीकंद हा ४५ कि.मी.चा ४५० कोटींच्या रस्त्याचाही डीपीआर तयार आहे. यामध्ये पुणे-सातारा रस्त्यावरील ५९ कि.मी. कामांत ठेकेदारांच्या काही अडचणी आहेत. हे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

‘डिसेंबरआधी कामे‘

जिल्ह्य़ात होणाऱ्या साडेबारा हजार कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाचे डीपीआर तयार आहेत. जमीन अधिग्रहणासाठी पैसेही देण्यात आले आहेत. मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहित करून दिल्यास चालू वर्षांत डिसेंबर आधी ही कामे सुरू करू, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rs 17500 crore spent on national highway works in pune district
First published on: 03-10-2017 at 04:31 IST