सराफी दुकानातून भरदिवसा हिऱयाचे दागिने लुटल्याचा घटनेला ४८ तास होण्याआधीच पुण्यात आणखी एका ठिकाणी दोन अज्ञात तरुणांनी एकाला मारहाण करून त्याच्याकडील २० लाख रुपयांची रोकड पळवून नेली. जगताप डेअरी ते वाकड फाटा या दरम्यान शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या हल्ल्यामध्ये अशोक अभ्यंकर (वय २४) जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभ्यंकर हे एका खासगी रोकड व्यवस्थापन कंपनीत अधिकारी आहेत. शुक्रवारी दुपारी ते हिंजवडी येथून रोकड गोळा करून परतत असताना वाकड फाट्याच्या पुढे आल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या डोक्यावर वार केले आणि त्यांच्याकडील २० लाख रुपयांची रोकड घेऊन ते दोन्ही तरूण पसार झाले. या घटनेनंतर अभ्यंकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, ते चोरट्यांचा शोध घेत आहेत.
बुधवारीच कोरेगाव पार्क येथील लेन क्रमांक सहामधील पीएमजे ज्वेलर्स या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून एक कोटी ४२ लाख रुपये किंमतीचे हिऱयाचे दागिने लुटून नेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा भररस्त्यात एकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड पळविण्यात आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.