तरुणाईचे राष्ट्र अशी वाटचाल होत असलेल्या भारताकडे कुशल मनुष्यबळ असलेला देश म्हणून जग आशेने पाहत आहे. नव्या आर्थिक व्यवस्थेमध्ये नावीन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे युवकांनी नावीन्याचा ध्यास घ्यावा. या कल्पनांना प्रोत्साहन देत समाजाने युवकांच्या पाठीशी राहून त्यांच्या कल्पनांचे मार्केटिंग करावे. अशा नावीन्यपूर्ण कल्पनांतूनच भारत आर्थिक महासत्ता होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला.
‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’तर्फे (जितो) आयोजित ‘जितो कनेक्ट २०१६’ या जागतिक परिषदेत फडणवीस बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अजय संचेती, अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, उद्योजक रसिकलाल धारिवाल, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. के. जैन, जितो पुणे विभागाचे अध्यक्ष विजय भंडारी, राजेश सांकला, तेजराज गुलेचा, राकेश मेहता, विजयकांत कोठारी, धीरज कोठारी, नरेंद्र छाजेड, अजित सेटिया या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी जितो चेन्नईतर्फे २१ लाख रुपयांचा धनादेश या वेळी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राज्यातील दुष्काळाशी सामना करणारी ५०० गावे दत्तक घेणार असल्याची घोषणा जितोतर्फे करण्यात आली.
फडणवीस म्हणाले,‘‘जगातील सर्व देशांमध्ये लोकसंख्येचे सरासरी आयुर्मान वाढत आहे. मात्र, २०२० पर्यंत भारतीय लोकसंख्येचे सरासरी आयुर्मान तिशीच्या आतच असेल. भारताच्यादृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. जगातील महत्त्वाचे देश आयुर्मानातील वाढीमुळे आर्थिक प्रगती गतीने करीत नाहीत. त्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था प्रगती तर करीतच आहे, पण त्याचबरोबरीने कुशल मनुष्यबळाला देशांतर्गत मागणीदेखील वाढत आहे. त्यामुळे औद्योगिक गुंतवणुकीसाठी भारत हा जगातील विविध देशांच्या कंपन्यांसाठी उपयुक्त देश ठरत आहे. या जागतिक परिस्थितीचा आढावा घेऊनच ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये जितोने सहभाग घेत देशाच्या विकासामध्ये भरीव योगदान द्यावे. जितोच्या माध्यमातून अनेक उद्योगांच्या विकासाला आणि विस्ताराला चालना मिळाली आहे. एक प्रकारे राज्याच्या उद्योग विकासाच्या धोरणाला अनुकूल असलेले काम जितोने व्यापक करावे.

त्रिसूत्रीच्याआधारे देशाला स्थान मिळवून देऊ
सध्या देशामध्ये विश्वसनीय नेतृत्व असून प्रत्येक भारतीयामध्ये असाधारण कामागिरी करण्याची क्षमता आहे. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त भारत ही आमची बांधीलकी आहे. आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान या त्रिसूत्रीच्या आधारे भारताला जगामध्ये योग्य स्थान मिळवून देऊ शकू, असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. पूर, भूकंप अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये जैन समाजाने मदतीचा हात पुढे केला असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्पादन कराबाबत प्रामाणिक व्यापाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. अशा कराच्यानिमित्ताने व्यापाऱ्यांची होणारी छळवणूक थोपविण्याची हिंमत मागील सरकारमध्ये नसल्याने आम्ही विरोधी पक्षात असताना विरोध केला होता. मात्र, आता कराच्या नावाखाली व्यापाऱ्यांचा छळ होऊ देणार नाही. गैरप्रकारांशी संघर्ष करून आमच्या कामावर तुम्ही लक्ष ठेवा, असेही गोयल यांनी सांगितले. आव्हान म्हणून कोळसा खात्याचे मंत्रिपद स्वीकारले. आज देशात अतिरिक्त कोळसा आणि वीज असल्याचे सांगतानाच प्रामाणिकता असेल तर यश मिळविता येते, असे गोयल यांनी स्पष्ट केले.