पुण्यातील येरवडा परिसरातील त्रिदाल नगरमध्ये १४ मांजरी, सात कुत्र्यांचे सामूहिक हत्याकांड घडवून आणणाऱ्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्याला ५० हजार रुपयांचे इनाम देण्याची घोषणा हयुमन सोसायटी इंटरनॅशनलने केली आहे. २८ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान या मुक्या जनावरांची हत्या करण्यात आली.

मृत मांजरी आणि कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. कोणाकडे याबद्दल कुठलीही माहिती असल्यास एचएसआय/इंडियाच्या या क्रमांकावर 8899117773 देण्याचे आव्हान करण्यात आले आहे. त्रिदलनगरमध्ये २८ डिसेंबर २०१८ रोजी ५ कुत्रे आणि ९ मांजरी असे एकूण १४ भटके प्राणी एकाच वेळी मरण पावल्याची घटना घडली होती.

त्यानंतर पुढील दहा दिवसांत आणखी ४ प्राण्यांचा येथे मृत्यू झाला होता. दहा दिवसांत एकूण १८ प्राण्यांच्या मृत्यूमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. ही भटकी कुत्री आणि मांजरं सोसायटीच्या परिसरात सतत भुंकत तसेच घाण करीत असल्याने सोसायटीमधील कोणीतरी व्यक्तीने अन्न पदार्थांमध्ये विषारी औषध घालून त्यांना मारले असल्याची शक्यता या सोसायटीतील रहिवाशी आणि प्राणीमित्र राकेश जगताप यांनी व्यक्त केली.