News Flash

लोणावळा शहरात साठ लाख रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा पकडल्या

मोटारीतील चौघांची चौकशी करण्यात आली, तेव्हा ही रोकड श्याम शिंदे यांची असल्याचे समजले.

लोणावळा शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून पकडलेल्या चलनातून बाद झालेल्या नोटा. सोबत पोलीस उपअधीक्षक डी. डी. शिवथरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व पोलीस पथक.

चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या चार जणांना लोणावळा शहर पोलिसांनी जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल कैलास पर्बत समोर सापळा रचून गुरुवारी रात्री पकडले. त्यांच्याकडून गाडीच्या डिकीत एका बॅगमध्ये ठेवलेल्या एक हजार रुपयांच्या सहा हजार नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नोटा बदलण्यासाठी आलेल्या तिघांसोबत एक पोलीसदेखील होता.

श्याम गोरख शिंदे (वय ४५, रा. एरंडवणे पुणे), पोलीस हवालदार रोहिदास जवाहर वाघिरे (वय ४३, रा. वाघिरेआळी, पिंपरी), बालाजी निवृत्ती चिद्रावार (वय ६५, रा. वडगावशेरी, पुणे), प्रशांत सुभाष शेवते (वय ४५, रा. फुरसुंगी, हडपसर ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहे.

लोणावळा विभागीय पोलीस अधिकारी डी.डी.शिवथरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारीतून काही जण चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी लोणावळ्यात येणार असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील  पोलीस कर्मचारी व्ही. ई. जांभळे, जे.व्ही.देवकर, ए.सी.वडेकर यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांना कळवण्यात आली.  लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि पथकाने सापळा लावून रात्री दहाच्या सुमारास  कैलास पर्बत हॉटेलनजीक मोटार थांबवली. मोटारीतील चौघांची चौकशी करण्यात आली, तेव्हा ही रोकड श्याम शिंदे यांची असल्याचे समजले. बालाजी चिद्रावार व प्रशांत शेवते चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून देणार असल्याची कबुली त्यांनी दिली.  मोटारीत शिंदे यांच्यासोबत पोलीस हवालदार रोहिदास वाघिरे होते. वाघिरे हे गेल्या माहिन्यभरापासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणाची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून चौघांची चौकशी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 2:50 am

Web Title: rs 60 lakhs old notes of rs 500 and 1000 seized by lonavla police
Next Stories
1 चार मगरी मृत्युमुखी, चार चोरीला!
2 पंढरपूरचा स्थापत्त्यशास्त्रीय अभ्यास पूर्णत्वास
3 कोल्हापुरी खाद्यसंस्कृती अनुभवण्याची संधी
Just Now!
X