पिंपरी चिंचवड येथील हिंजवडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘शिवशक्ती संगम’ मेळावा आज पार पडला. विविधतेला भेददृष्टीने पाहू नका, समतेच्या दृष्टीकोनातून पाहा, नुसत्या कायद्याने समरसता येत नाही त्यासाठी मनातून विषमता नाहिशी होणे गरजेचे असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मेळाव्यास संबोधित करताना म्हटले.
दरम्यान, या कार्यक्रमात एकाचवेळी दीड लाख स्वयंसेवकांचे संचलन झाले. तर समुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज मंत्र्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तसेच प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आदी उपस्थित होते. राज्यभरातून संघाचे जवळपास दीड लाख स्वयंसेवक मारुंजीत या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते. या शांत आणि शिस्तबद्ध मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले विराट शक्तीप्रदर्शन केले.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्देः

* सध्याच्या वातावरणात देशाची प्रगती होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एकमेव उपाय.
* केवळ सरकार आणि नेत्यांमुळे नाही तर समाज जागल्याने देशाची उन्नत्ती होईल.
* जगामध्ये समाजात कुठेही दु:ख असो त्यांच्या मदतीला स्वत:च्या प्रेरणेने धावून जाणारा संघ अशी आपली ओळख आहे.
* शत्रूच्या बळामुळे आपण पराभूत होत नाही तर आपल्या समाजामध्येच काही त्रुटी आहेत.
* शिवत्व आणि शक्ती यांची एकाच वेळेस आराधना होणे आवश्यक आहे.
* नुसत्या कायद्याने समरसता येत नाही त्यासाठी मनातून विषमता नाहिशी होणे आवश्यक आहे.
* कुढल्याही शत्रूला स्वकतृत्त्वावर आपला देश जिंकता आलेला नाही.
* सगळ्यांना जोडून ठेवतो, सगळ्यांची उन्नत्ती करतो तो म्हणजे धर्म.
* सत्यामध्ये भेदाभेद, विषमता यांना स्थान नाही.
* जो सत्यनिष्ठ नाही तो शीलसंपन्न होऊ शकत नाही.
* आपल्याकडे त्याग आणि चारित्र्याला खूप महत्त्व आहे.
* देशाची प्रतिष्ठा व शक्ती वाढल्याने युनोमध्ये योगसंबंधीचा प्रस्ताव एकमताने मान्य झाला.
* जशी जशी आपल्या देशाची शक्ती वाढत जाते तशी तशी देशाच्या सत्याची प्रतिष्ठाही वाढते.
* स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढली.
* दुर्बल राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींही विचारात घेतल्या जात नाहीत.
* आपलं संगठण हे व्यक्तिनिष्ठ नसून तत्त्वनिष्ठ आहे. आपण तत्त्वांचं अनुसरण करायला हवं.
*  शिवाजी महाराजांपुढे अखिल भारतीय प्रदेश होता.