संघाच्या पुणे महानगरातर्फे विविध भागात पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजया दशमीनिमित्त सात हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी पथसंचलनाच्या माध्यमातून मंगळवारी संघशिस्तीचे दर्शन घडविले. संघाच्या बदललेल्या नव्या गणवेशाचे औत्सुक्य सर्वच स्वयंसेवकांमध्ये होते आणि घोषपथकासह संचलन सुरू होताच साऱ्यांनी पथसंचलनामध्ये सहभाग घेत शिस्तीचा वस्तुपाठ घालून दिला.

विजया दशमी निमित्त संघातर्फे शहरात घोष पथकांसह ४४ संचलने काढण्यात आली. विविध भागात काढण्यात आलेल्या सघोष संचलनांमध्ये एकूण सात हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी संपूर्ण नव्या गणवेशासह सहभाग घेतला. शिवाजीनगर येथील एसएमपीएमएस आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर प्रशांत जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून पथसंचलनाचा प्रारंभ केला. बहुतांश ठिकाणी सकाळी सात वाजता संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्वयंसेवक बदललेल्या गणवेशात सकाळपासून येताना दिसत होते. पथसंचलन मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळीच्या पायघडय़ा, तसेच विविध फुलांच्या आणि पाकळ्यांची सजावट केली होती. गोखलेनगरातील जनवाडी परिसर आणि कोंढव्यातील मीठानगर परिसरातून निघालेल्या संचलनामध्ये सहभाग घेतलेल्या स्वयंसेवकांवर आणि भगव्या ध्वजावर मुस्लीम बांधबांनी पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत केले.

संघ कामात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशातून यंदापासून संघाच्या गणवेशामध्ये हाफपँटऐवजी फुल पॅंट असा बदल करण्यात आली होता. त्याला प्रतिसाद देत अनेक युवा स्वयंसेवकांनी मोठय़ा प्रमाणात नव्या गणवेशाची खरेदी केली आणि संपूर्ण गणवेशासह ते संचलनात सहभागी झाले होते. तरूणांसोबत अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांनीही नव्या गणवेशासह संचलनात सहभाग नोंदविला. या गणवेश बदलाविषयी स्वयंसेवकांना औत्सुक्य होते. तर, ज्येष्ठ स्वयंसेवकांनी हा बदल सहजपणाने स्वीकारल्याचे दिसून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्राचार्य अनिरूद्ध देशपांडे, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह अनेक मान्यवरांनी संपूर्ण नव्या गणवेशासह संचलनात सहभाग नोंदविला होता.

वैशिष्टय़े

  • नवा गणवेश सर्वाच्या आकर्षणाचा केंद्रिबदू
  • मुस्लीम बांधवांकडून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी
  • महानगरात जागोजागी नागरिकांकडून संचलनाचे स्वागत
  • रांगोळी आणि फुलांनी सजलेले संचलनाचे मार्ग
  • संचलनातील युवकांची लक्षणीय संख्या
  • शहरातील मान्यवरांचा संचलनात सहभाग